कृषी

जाणुन घेऊयात कोण आहेत सप्टेंबर महिन्याचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आयडॉल्स

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रगतशील शेतकरी व महात्मा फुले कृषि विद्यापीठात पदवी घेतलेले यशस्वी कृषि उद्योजक यांचा परिचय समस्त शेतकरी वर्गाला आणि विद्यार्थ्यांना व्हावा या उद्देशाने कुलगुरु डॉ. पाटील यांनी नविन संकल्पना राबविली आहे. यामध्ये दर महिन्याला एक प्रगतशील शेतकरी व एक कृषि पदविचा कृषि उद्योजक यांच्या कार्याविषयी माहिती असलेला फलक विद्यापीठ प्रवेशद्वार, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या दर्शनी भागात तसेच विद्यार्थी वसतीगृहाचा दर्शनी भागात या ठिकाणी लावण्यात येतो तसेच विद्यापीठाच्या दहा जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रातील कृषि महाविद्यालये, संशोधन केंद्रे आणि कृषि विज्ञान केंद्रे येथील प्रवेशद्वाराजवळ लावण्यात येतो जेणेकरुन संबंधीत प्रगतशील शेतकरी व कृषि उद्योजक यांच्या कार्याचा परिचय विद्यापीठाला आणि कृषि महाविद्यालयांना, कृषि संशोधन केंद्रांना व कृषि विज्ञान केंद्राना भेट देण्यासाठी येणार्या शेतकरी, अधिकारी व विद्यार्थ्यांना होतो. तसेच या व्यक्तिंचा आदर्श घेऊन तरुण शेतकरी व पदवीधरांना प्रेरणा मिळते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषि महाविद्यालये, कृषि संशोधन केंद्रे, कृषि तंत्र विद्यालये यांच्या दर्शनीय क्षेत्रात ही आयडॉल्स् प्रत्येक महिन्याला प्रदर्शीत करण्यात येतात.
सप्टेंबर 2022 या महिन्याकरीता शेतकरी आयडॉल म्हणुन मु.पो. कोल्हार, ता. राहाता, जि. अहमदनगर येथील श्री. संजय राऊत व कृषि उद्योजक म्हणुन पुणे कृषि महाविद्यालयातून बी.एस्सी (कृषि) चे शिक्षण घेतलेले पुणे येथील पंडित शिकारे यांचा समावेश आहे. संजय राऊत यांनी गांडूळ खत प्रकल्प, व्हर्मी वॉश युनिट तसेच व्हर्मी कल्चर युनिटची स्वंतत्रपणे उभारणी करुन गांडूळ खत, व्हर्मी वॉश व व्हर्मी कल्चर यांचे यशस्वीपणे उत्पादन घेवून विक्री करत आहेत. तसेच या उत्पादनांचा 20 ते 25 टक्के वापर स्वतःच्या शेतात करुन 70 टक्क्यांपर्यंत रासायनीक खतांचा वापर कमी करुन शेती करत आहेत. कृषि उद्योजक असलेले श्री. पंडित शिकारे यांनी ग्रीन हाऊस उभारुन त्यामध्ये डच गुलाबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. उत्पादन काढणीनंतर ग्राहकांपर्यंत पुरवठा करतांना कोल्डचेनचा यशस्वी वापर केला आहे. श्री. शिकारे यांनी डच गुलाबाची निर्यात करुन देशाला परकीय चलन मिळवून देण्यात पुढाकार घेतला आहे. त्यांनी आत्तापर्यंत मावळ तालुक्यातील हजारो शेतकर्यांना ग्रीन हाऊस तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले आहे व देत आहेत.

Related Articles

Back to top button