कृषी
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत शास्त्रज्ञ शेतकर्यांच्या बांधावर
राहुरी विद्यापीठ : माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील शास्त्रज्ञ दिवसभर शेतकर्यांच्या शेतावर होते. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात राहुरी तालुक्यातील तांभेरे आणि कानडगाव या गावातून झाली.
यावेळी संचालक संशोधन आणि विस्तार शिक्षण डॉ. शरद गडाख, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. पंडित खर्डे, शास्त्रज्ञ डॉ. वसंत पोखरकर, डॉ. गोकुळ वामन, डॉ. सचिन सदाफळ, डॉ. भगवान देशमुख, प्रा. अन्सार अत्तार शेख, डॉ. संजय तोडमल उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे आधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनिल गोरंटीवार, डॉ. मुकुंद शिंदे यांनी बाबुर्डी घुमट, जि. अहमदनगर या गावातील शेतकर्यांना भेट दिली. त्याच पध्दतीने विद्यापीठातील इतर शास्त्रज्ञ यांनी विविध गावांना भेटी दिल्या. या शास्त्रज्ञांनी पूर्ण दिवस शेतकर्यांबरोबर घालविला.
शेतकर्यांना त्याच्या दैनंदिन शेती कामामध्ये येणार्या अडचणी जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान शास्त्रज्ञांनी त्या गावातील शासकीय, निमशासकीय संस्थांना भेटी दिल्या. शेतकर्यांबरोबर चर्चा करतांना त्या गावातील पीक पध्दती, प्रत्येक पिकावर येणारा खर्च व त्याचे उत्पन्न याचा ताळेबंद अनौपचारीक चर्चेतून जाणून घेतला. विद्यापीठांनी विकसीत केलेले तंत्रज्ञान, शेतकरी वापरत असलेले तंत्रज्ञान, गावामधील पीक पध्दती, ग्राम विकास आराखडा या बद्दल शेतकर्यांबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शास्त्रज्ञांनी विविध शेतकर्यांच्या शेतावर भेटी देवून त्यांना मार्गदर्शन केले.
कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे प्रमुख असलेल्या शास्त्रज्ञांच्या चमुने पाथर्डी तालुक्यातील शिराळ या गावातील शेतकर्यांच्या शेतावर भेट देवून शेतकर्यांशी विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले. औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पाचे प्रमुख डॉ. विक्रम जांभळे व जीन बँकेचे प्रमुख डॉ. विलास आवारी या शास्त्रज्ञांनी राहुरी तालुक्यातील मानोरी व देहरे या गावातील शेतकर्यांच्या शेतावर भेट देवून त्यांना मार्गदर्शन केले. कृषि शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष शेतावर भेट देवून विचारपूस केली याबद्दल शेतकर्यांनी आनंद व्यक्त केला. माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाला शेतकर्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.