अहिल्यानगर

‘सेवाभावी व्यक्तिमत्व पुरस्कार’हा जीवनातला अपूर्व सन्मान आहे – काशिनाथ गोराणे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे स्व.नामदेवराव सुकळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण प्रसंगी मला प्रदान करण्यात आलेला ‘सेवाभावी व्यक्तिमत्व पुरस्कार’ हा माझ्या जीवनातला अपूर्व सन्मान आहे, असे भावपूर्ण उदगार अशोक सहकारी साखर कारखान्याचे मा.कामगार संचालक, सहकार चळवळीतील जेष्ठ नेते काशिनाथ गोराणे पंतबाबा यांनी काढले.
येथील माऊली वृद्धाश्रमात विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या वतीने स्व.नामदेवराव विश्वनाथ सुकळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक सेवाभावी उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्री काशिनाथ गोराणे पंतबाबा यांना पुरस्कारचिन्ह, शाल, बुके, पुस्तके कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.राजीव रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी काशिनाथ गोराणे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई.शेळके, माजी प्राचार्य शन्करराव अनारसे उपस्थित होते.
प्रारंभी स्व.नामदेवराव सुकळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. सर्व मान्यवरांचा बुके, शाल आणि पुस्तके देऊन सत्कार केले.माऊली वृद्धाश्रमाचे संस्थापक, अध्यक्ष सुभाष वाघुंडे आणि सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी वृद्धाश्रमातर्फे सर्व पाहुणे यांचे सत्कार केले. सुभाष वाघुंडे यांनी वृद्धाश्रमाची माहिती दिली. डॉ.बाबुराव उपाध्ये, संगीता फासाटे यांनी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान आणि पुरस्कारप्राप्त काशिनाथ गोराणे यांच्या व्यक्तिमत्वाचे मोठेपण विशद केले.
काशिनाथ गोराणे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना पुढे सांगितले की, माझ्या जीवनावर अनेकांचे संस्कार आणि उपकार आहेत. सद्गुरू नारायणगिरी महाराज, गुरुवर्य डॉ. वा.पु.गिंडे, डॉ.अण्णासाहेब शिंदे, ॲड. रावसाहेब शिंदे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, भागवतराव खाडे इत्यादी सेवाभावी व्यक्तिमत्वामुळे जीवनात समाधान आणि खूप शिकायला मिळाले. ही माझ्या जीवनातील देवमाणसं आहेत, ज्यांच्या जीवनात आचार आणि विचारांची संगती आहेत तीच खरी देवमाणसं आहेत. डॉ. राजीव शिंदे हे आपल्या विचार, कार्यातून असा वसा आणि वारसा जपत असल्याचे काशिनाथ गोराणे यांनी सांगून सुखदेव सुकळे यांनी आपला मोठा सन्मान केल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी प्राचार्य शन्करराव अनारसे, प्राचार्य टी. ई. शेळके, आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड, शरद लोढा यांनी मनोगते व्यक्त करून काशिनाथ गोराणे यांचा सत्कार केला. प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे, तानाजीराव कासार, भीमराज बागुल, डॉ. बाबुराव उपाध्ये आदिंनी पुरस्कारमूर्ती गोराणे यांचा सत्कार केला.
डॉ. राजीव शिंदे यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, काशिनाथ गोराणे हे संतमनाचे सेवाभावी व्यक्तिमत्व आहे, त्यांना लाभलेला हा पुरस्कार योग्य असून विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानने माऊली वृद्धाश्रमासारख्या सेवाभावी ठिकाणी हा पुरस्कार दिला आहे, त्याबद्दल सुखदेव सुकळे यांचे विशेष कौतुक आहे, असे सांगून आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रसंग सांगितले. प्रकाश नीलकंठ यांनी वृद्धाश्रमासाठी दोन हजार रुपयांचा चेक प्रदान केला. यावेळी सौ. छायाताई काशिनाथ गोराणे, ऋषी काशिनाथ गोराणे, डॉ.प्रकाश मेहकरकर सौ.पूनम ऋषी गोराणे, बाळासाहेब बुरकुले, संजय बुरकुले, संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले, सौ.सुरेखा बुरकुले, सुरेश गड्डेगुरुजी, रामराव पडघन, शुभम नामेकर इत्यादींसह बुरकुले, सुकळे, नीलकंठ परिवार उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये आणि संगीता फासाटे यांनी केले तर सुदामराव औताडे पाटील यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button