उच्च प्रतिच्या मधमाश्यांच्या निर्मितीमुळे शाश्वत मधमाशीपालन शक्य – विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील
राहुरी विद्यापीठ – महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये 1.55 हेक्टर क्षेत्रावर मधमाशी प्रकल्प उभारण्यात आला आहे. शेतकर्यांमध्ये भारतीय मधमाशीबद्दल जनजागृती करणे तसेच मधमाश्यांची संख्या वाढविणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. उच्च प्रतिच्या मधमाशींच्या बिजांची निर्मिती व नविन राणीमाशीचे उत्पादन तत्रंज्ञान आत्मसात केले तरच आपण शाश्वत मधमाशीपालन करु शकतो असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मधमाशी मंडळ, कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभाग, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत पश्चिम महाराष्ट्र मध्ये शाश्त्रोक्त पद्धतीने मधमाशी पालन, उच्च प्रतीचे मधमाशी बीज केंद्राचा विकास आणि मधु वनस्पतींची/ फुलोरा यांची लागवड या प्रकल्पांतर्गत कृषी कीटक शास्त्र विभागाच्या वतीने दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. सी.एस. पाटील बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन महाबळेश्वर येथील खादी आणि व्हिजेल इन्डट्रीज बोर्डाचे संचालक डॉ. डी.आर. पाटील ऑनलाईन उपस्थित होते. याप्रसंगी पुणे येथील केंद्रिय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माजी प्रकल्प उपसंचालक डॉ. डेझी थॉमस, बंगलोर येथील हनी डे बी फार्मचे संचालक बी.व्ही. अपुर्वा, उटी (केरळ), येथील तांत्रिक मार्गदर्शक जस्टीन राज व ज्वारी सुधार प्रकल्पाचे ज्वारी किटकशास्त्रज्ञ डॉ. उत्तम कदम उपस्थित होते.
डॉ. डी.आर. पाटील आपल्या ऑनलाईन मार्गदर्शनात म्हणाले की, मधमाशीपालन ही एक कला असून राणी माशीचे उत्पादन तंत्र आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. चांगल्या प्रतिच्या मधीमाशींच्या वसाहती मधमाशी पालकांना पुरविणे गरजेचे आहे. अशा प्रकारे जास्तीत जास्त मधपालक तयार झाल्यामुळे मधमाशीच्या व मधाच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्य अग्रेसर बनेल. मधमाश्यांची संख्या वाढल्यामुळे फळे, भाजीपाला व तेल बियांच्या उत्पादनामध्ये निश्चितच वाढ होण्यास मदत होणार आहे.
दोन दिवसांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. डेझी थॉमस, बी.व्ही. अपूर्वा व जस्टीन राज हे तज्ञ मार्गदर्शक मदमाशी पालनाविषयीच्या विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर.व्ही. कडू यांनी तर आभार डॉ. संदिप लांडगे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी किटकशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक तसेच आचार्य व पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होत्या.