देवळाली प्रवराच्या शाळेत मुख्यमंत्रीपदी सार्थक कासोळे तर उपमुख्यमंञी वेदिका सुर्यवंशी, आदिल सय्यद यांची निवड
मुख्यमंञ्यांनी केली मंञिमंडाळाची घोषणा
देवळाली प्रवरा | प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होवून महाविकास आघाडी सरकार कोसळून आघाडी सरकारने सत्ता स्थापन केली. राज्याच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडत असताना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थानच्या गेल्या दोन वर्षांपासुन निवडणूका लांबल्या आहेत. आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार असल्याने विधानसभेच्या निवडणूकीचा अनुभव शालेय विद्यार्थ्यांना यावा यासाठी विधानसभेच्या निवडणूका घेण्यात आल्या. देवळाली प्रवरात जिल्हा परीषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेच्या मुख्यमंत्रीपदी सार्थक कासोळे यांची तर उपमुख्यमंञीपदी वेदिका सुर्यवंशी, आदिल सय्यद या दोघांची निवड करुन शपथ विधी पार पडला. मुख्यमंत्री यांनी मंञिमंडाळाची यादी जाहिर केली.देवळाली प्रवरा जिल्हा परीषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेत निवडणूक म्हणजे काय? मोठी माणसे मतदान कसे करतात? प्रचार कसा करतात? मतमोजणी कशी करतात? शाई का लावतात? आणि एकूण प्रक्रिया कशी असते? असे अनेक प्रश्न विद्यार्थी शाळेतील शिक्षकांना सतत विचारत असतात. शाळेच्या आवारात निवडणूक कार्यक्रम राबवून निवडणूक प्रक्रियेची प्रात्यक्षिक माहिती देण्यात आली.
शालेयस्तरावर इयत्ता दुसरी ते चौथी च्या वर्गातील विद्यार्थ्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले. 22 विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. 22 उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने निवडणूकीत चुरस वाढली होती. प्रचारासाठी पाच दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. प्रत्येक वर्गात विधानसभेचे उमेदवार प्रचार करताना दिसत होते. प्रचारात शाळेसाठी करण्यात येणारी कामे, विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय कसे घेणार, आपली बाजू समजावून सांगत होते. मीच योग्य उमेदवार असल्याचे पटवून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन मतदारांना करीत होते.
मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी शिक्षकांनी जय्यत तयारी केली होती. मतदान कक्ष उभारण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वनिता तनपुरे यांची नियूक्ती करण्यात आली. मतदान अधिकारी म्हणून भारती पेरणे यांची तर मतदान व मतमोजणी कर्मचारी म्हणून लक्ष्मी ऐटाळे, सुनिता मुरकुटे, मिनाशी तनपुरे, स्वाती पालवे, जकिया इनामदार, सुप्रिया आंबेकर या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. शाळेतील 348 विद्यार्थ्यांपैकी 299 विद्यार्थ्यांनी मतदानात भाग घेतला. मतदान केंद्राबाहेर मोठी रांग लावून दरवाज्याजवळ एका विद्यार्थ्यांस पोलीस बनवले आणि रांगेवर नियंत्रण ठेवण्यास सांगितले. मतदान केंद्राबाहेर उमेदवार मतदारांना हात जोडून अभिवादन करुन मतदान करण्याचे सांगत होते. प्रथम मतदार यादीतील नावावर मतदान केल्याची नोंद करुन डाव्या हातास शाई लावली जात होती. मतदारांनी 22 उमेदवारांना बँलेट पेपरवर मतदान करुन मतपेटीत मतदान टाकीत होते.
दुसरी ते चौथी पर्यंतसाठी प्रत्येक वर्गासाठीची विविध पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. एकुण 299 झाले होते. त्यापैकी 50 मते बाद झाली. 22 उमेदवारांपैकी 12 उमेदवारांना प्रतिस्पर्धी उमेदवारा पेक्षा जास्त मते मिळाल्याने 12 उमेदवार या निवडणूकीत विजय मिळाला. आदिल सय्यद 24 मते, जयेश गोरे 21मते, सात्विक कदम 23 मते, ओम चव्हाण 5 मते, वेदीका सुर्यवंशी 27 मते, गायञी होले 4 मते, ज्ञानेश्वरी पेरणे 10 मते, आर्या घोरपडे 9 मते, सार्थक कासोळे 25 मते, जेबा शेख 10 मते, योगिता मोरे 8 मते, अवनी पंडीत 8 मते, वैष्णवी पठारे 9 मते, अर्जुन पिसाळ 4 मते, श्रावणी भागवत 3 मते, अक्षदा कदम 3 मते, श्रेया गाडे 5 मते, समिक्षा शेटे 6 मते, साई वायफळकर 6 मते, मनस्वी मोरे 11 मते, साई मोरे 6 मते उमेदवारांना पडली आहे.
22 उमेदवारांपैकी 12 उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांची बैठक होवून मुख्यमंञी व उपमुख्यमंञी पदी कोणाची निवड करायची यावर चर्चा झाली. सर्वाधिक मते मिळविणाऱ्या उमेदवारास मुख्यमंत्री करण्याचे ठरले. मिळालेल्या मतांनुसार मंञीपद देण्याचे ठरविण्यात आले. त्या प्रमाणे मुख्यमंत्रीपदी सार्थक कासोळे यांची निवड करण्यात आली त्यांना 25 मते मिळाली होती. उपमुख्यमंञी पदी वेदिका सुर्यवंशी (27), आदिल सय्यद (24) यांची निवड करण्यात आली. तर अभ्यासमंञी सात्वीक कदम (23), स्वच्छतामंञी जयेश गोरे, मनस्वी मोरे (22), शिस्तमंञी ज्ञानेश्वरी पेरणे, जेबा शेख (10), क्रिडामंञी आर्या घोरपडे, वैष्णवी पठारे (9), शालेय पोषण आहार मंञी योगिता मोरे, अवनी पंडीत (8) आदी उमेदवारांना समान मते मिळाली असल्याने मंञी व उपमंञी अशी निवड करण्यात आली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर मंञिमंडळाची यादी जाहिर होताच सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला व गुलाल लावून आनंद साजरा केला. निवड झालेल्या मंत्र्यांचे पुष्पहार घालुन विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वेगळा अनुभव मिळाला
आई वडील मतदान करायला जातात पण मतदान कसे करतात याची कल्पनाही नव्हती. आज मतदान कसे करतात, एका मतास किती महत्व असते हे आज समजले आहे. मतदानाचा अधिकार असल्यामुळे आपल्या पसंतीच्या उमेदवारास निवडता येते. शाळेत झालेल्या मतदानामुळे आम्हाला समजले आहे. मतदान करताना खूप मजा वाटली. वेगळा अनुभव सर्व विद्यार्थ्यांना मिळाला आहे.
श्रेया प्रमोद गाडे ( विद्यार्थिनी इयत्ता-४थी )
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे आध्यक्ष राजेंद्र उंडे, प्रभारी मुख्याध्यापक हसन शेख यांनी अभिनंदन केले. निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना कामे कशी करायची, शिक्षकांना मदत केव्हा करावी, शिस्त व स्वच्छता ठेवण्यासाठी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिक्षकांच्या वतीने करण्यात आले. विधानसभा निवडणूक निरीक्षक म्हणून शिक्षक शिवाजी जाधव, सुभाष अंगारखे, अर्जुन तुपे, हसन शेख यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले.
शालेय मंत्रिमंडळ तयार केल्याचा आनंद
शालेय मंत्रिमंडळ तयार केल्याचा आनंद विद्यार्थ्यांमध्ये दिसत होता. लहानपणापासून लोकशाहीचे धडे शाळेतच दिले तर विद्यार्थी जागरूक नागरिक तयार होतील. नविन तंञज्ञानाच्या मशनरी उपलब्ध न झाल्याने बँलेट पेपरवर निवडणूक घेण्यात आली. शालेय मंत्रिमंडळ तयार केल्याचा आम्हाला आनंद होत आहे.
स्वाती पालवे, शिक्षिका.