शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब करावा – विस्तार शिक्षण संचालक डॉ. पाटील
राहुरी विद्यापीठ : शेतकऱ्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता विद्यापीठाने विकसीत केलेल्या एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब करावा. एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब केल्याने उत्पादन व उत्पन्नात नक्कीच वाढ होवून जीवनमान उंचविण्यास मदत होईल. पीक पध्दतीत बदल करून शेतकरी आपले उत्पन्न वाढवत आहे. परंतु प्रत्येक शेतकऱ्यांने पौष्टीक तृणधान्य थोड्या प्रमाणात का होईना आपल्या शेतात पेरावे व आपल्या आहारात त्याचा समावेश करावा. यामुळे आपले आरोग्य चांगले राहिल व भावी पिढी सुदृढ होईल. मधमाशीमुळे पिकांचे उत्पादन वाढुन जैवविविधता टिकुन राहण्यास मदत होते. म्हणुन शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती बरोबर मधुमक्षिका पालन करावे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील यांनी केले.
कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठातील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत रब्बी ज्वारी व हरभरा उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन तांभेरे गावात करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील बोलत होते. यावेळी प्रसारण केंद्र प्रमुख तथा शेतकरी प्रथप प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. पंडित खर्डे, कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. दत्तात्रय पाचारणे, मृदा विश्लेषक डॉ. अनिल दुरगुडे, ज्वारी किटकशास्त्रज्ञ डॉ. उत्तम कदम, ज्वारी शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ. विलास आवारी, प्रकल्पाचे सह समन्वयक डॉ. सचिन सदाफळ व मुंबई दुरदर्शन केंद्राचे कार्यक्रम निर्माते विजय मोदड उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ पंडित खर्डे यांनी केले. यावेळी डॉ. अनिल दुरगुडे यांनी रब्बी पिकांचे खत व्यवस्थापन, डॉ. नंदकुमार कुटे यांनी हरभरा उत्पादन तंत्रज्ञान, डॉ. विलास आवारी यांनी रब्बी ज्वारीची पंचसूत्री व डॉ. उत्तम कदम यांनी रब्बी ज्वारीतील किड व्यवस्थापन, डॉ. दत्तात्रय पाचारणे यांनी रब्बी पिकांची बियाणे उपलब्धता या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांनी चिंचविहीरे गावातील श्री स्वामी समर्थ महिला बचत गटाला भा.कृ.अ.प. शेतकरी प्रथम प्रकल्पाद्वारे दिलेल्या दाळमिल युनिट, सौ. सविता नालकर यांचे एकात्मिक शेती पध्दती मॅडेल, कणगर गावातील राजेंद्र वरघुडे यांचे एकात्मिक शेती पध्दती मॅडेल, कानडगाव येथील लक्ष्मण गागरे यांचे तुर व सोयाबीन आंतरपिके प्रात्यक्षिक, राधाकृष्ण गागरे यांचे शेळी प्रकल्प व सोयाबीन पीक प्रात्यक्षिके या प्रकल्पांना भेटी दिल्या. मुंबई दुरदर्शन केंद्राचे कार्यक्रम निर्माते विजय मोदड व त्यांचा चमुने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे चित्रीकरण केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रगतशील शेतकरी सुधाकर मुसमाडे, सुनिल शेलार, मेजर ताराचंद गागरे, प्रविण गाडे, मारुती गीते, भाऊसाहेब गागरे तसेच चिंचविहीरे, कणगर, तांभेरे व कानडगाव या गावातील 100 पेक्षा जास्त शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन सदाफळ यांनी केले तर आभार विजय शेडगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल कोर्हाळे व किरण मगर यांनी परिश्रम घेतले.