साहित्य व संस्कृती
साहित्याचा गंध ‘शब्दगंध’ ने दरवळत ठेवला – कवी शेटे; शब्दगंध’ चे उत्सव कवितेचा काव्यसंमेलन संपन्न
राहुरी | बाळकृष्ण भोसले : विचाराच्या माध्यमातून परिवर्तनाचा प्रकाश पेरण्यासाठी कवितेचा उत्सव महत्वाचा असुन शब्दगंध ने या उपक्रमामध्ये सातत्य राखून साहित्यिकांना विचाराचे पाठबळ दिले आहे असे मत ज्येष्ठ कवी एस.बी.शेटे यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने दीपावली पाडव्याच्या पूर्वसंध्येला कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित “उत्सव कवितेचा” या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी विचारपिठावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ.ॲड सुभाष लांडे पाटील, साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य दिनेश औटी, संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, कॉ.स्मिता पानसरे, निवृत्ती श्री मंदीलकर, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे व संस्थापक सचिव सुनील गोसावी इ मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कवी एस.बी.शेटे पुढे म्हणाले की, सूर्यफुलाचे बी कुठेही, कधीही आणि कसेही पेरले तरी त्याचे तोंड मात्र सदैव पूर्व दिशेलाच असते,त्याच प्रमाणे कुठल्याही कामावर श्रद्धा, निष्ठा आणि सातत्य ठेवून एखादे काम हाती घेतले की, छोट्याशा रोपट्याचा कसा वटवृक्ष होतो, त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शब्दगंध साहित्यिक चळवळ होय. शब्दगंधने संपूर्ण महाराष्ट्रात आपला साहित्यिक गोतावळा निर्माण करून साहित्याचा गंध दूरपर्यंत दरवळत ठेवला आहे. असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना ॲड कॉ. सुभाष लांडे पाटील म्हणाले की शेवगावच्या महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांसाठी चळवळ सुरू केली. प्रागतिक व पुरोगामी विचाराने चाललेल्या या चळवळीला अनेकांनी पाठिंबा दिला. श्रमजीवी जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवूनच आत्तापर्यंतची वाटचाल सुरू आहे. पक्षाने राज्य सचिव पदाची जबाबदारी सोपवल्यामुळे आता अधिक जोमाने प्रागतिक विचाराचा वारसा पुढे चालू ठेवणार आहोत. साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य दिनेश औटी बोलतांना म्हणाले की, शब्दगंध चळवळीने अनेकांना लिहीते केले असून, नवोदिताना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचे काम केले. दिवाळीत होत असलेले हे काव्य संमेलन नवोदित साहित्यिकांना ऊर्जा देणारे ठरेल, असे ते म्हणाले.
यावेळी शांताराम खामकर, डॉ. शंकर चव्हाण, चंद्रकांत पालवे, ऋता ठाकूर, बाळासाहेब मंतोडे, आत्माराम शेवाळे, रज्जाक शेख, माधव सावंत, अमोल आगाशे, बाळासाहेब कोठुळे, पी.एन. डफळ, बेबीताई गायकवाड, दादा ननवरे, कृष्णा बाळासाहेब अमृते, अजयकुमार पवार, सुनील कुमार धस, स्वाती ठुबे, सुभाष सोनवणे, बबनराव गिरी, देविदास बुधवंत, सोमा चौधरी, बाळ साळवे, कार्तिक झेंडे, अविष्कार इकडे, डॉ.सुदर्शन धस, किशोर डोंगरे, वसंत डंबाळे, शुभदा कुलकर्णी, मारुती सावंत, प्रकाश खंडागळे, उद्धव काळापहाड, कृष्णकांत लोणे, आदित्य न्यालपेल्ली, संगीता दारकुंडे यांनी आपल्या रचना सादर केल्या.
सुनील गोसावी यांनी प्रास्ताविक केले. शर्मिला गोसावी यांनी काव्य संमेलनाचे सुत्रसंचलन केले. भगवान राऊत यांनी आभार मानले. शाहीर भारत गाडेकर यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताने काव्य संमेलनाचा समारोप झाला. या कवी संमेलनास ॲड.कॉ. बन्सी सातपुते, प्रा. मेधा काळे, बेल्हेकरवाडीचे सरपंच भरत बेल्हेकर, जमशिदभाई सय्यद, डॉ.वैभव शेटे, विजय साबळे, प्रवीण अनभुले, महादेव शिंदे, प्रा.डॉ.अनिल गर्जे, पी.एन. सुरकुटला, विक्रांत कनगे, प्रा.डॉ. संदिप सांगळे, दशरथ खोसे, मंगल डोंगरे, संदीप रोडे, विनोद शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.अशोक कानडे, डॉ.तुकाराम गोंदकर, ऋषीकेश राऊत, दिशा गोसावी, भाग्यश्री राऊत, हर्षली गिरी यांनी विशेष परिश्रम घेतले.