श्रीक्षेत्र गोदावरी धाम दिंडीत हिंदू मुस्लीम ऐक्याचे दर्शन
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : श्रीक्षेत्र गोदावरी धाम ते पंढरपूर दिंडीचे शिरसगाव येथे उस्फुर्त स्वागत करण्यात आले. सर्व वारकरी यांना ग्रामस्थांच्या वतीने खिचडी प्रसाद, बूब यांच्या वतीने पिण्याचे पाण्याच्या बाटल्या, मुस्लीम समाजाच्या वतीने केळी वाटप, तसेच सर्व वारकऱ्यांना प्रसाद वाटप, पाणी वाटप सर्व कार्यात ग्रामस्थांबरोबर मोलाचे सहकार्य केल्याने शिरसगावात हिंदू मुस्लीम ऐक्याचे दर्शन पहावयास मिळाले.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने शिरसगाव येथे अखंड हरीनाम सप्ताह मिळावा अशी मागणी गणेशराव मुदगुले यांनी केली. शिरसगाव येथे दिंडी आल्यावर वारकरी, भाविकांसमोर महंत रामगिरी महाराज यांनी प्रतिपादन केले की, सद्गुरू गंगागिरी महाराज व सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या कृपेने हा पायी दिंडी सोहळा साजरा करीत आहोत. शिरसगाव येथे नेहमीच भक्तीचे कार्यक्रम घेतले जातात. ते पूर्वीपासून बेटाशी जोडलेले आहे.
दिंडी सोहळा वारकरी संप्रदायासाठी फार महत्वाचा असतो. माउली ज्ञानेश्वरराया, जगतगुरू तुकोबाराया आदी सर्व संत हे पंढरीचे वारकरीच जातात. पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. डोळ्याचे पारणे फेडणारे असे ते देवाचे रूप आहे. म्हणून वारकरी इतक्या लांबून पायी पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. भगवंताला भक्ताला भेटण्यासाठी उतावीळ झाला आहे. भक्ताला भेटणे हाच पांडुरंगाचा उद्देश आहे. तो लावण्याचा पुतळा आहे. मानला आकर्षक करणारा लावण्याचा सागर आहे. भक्ताला अभयदान देणारा आहे. जो त्याचेकडे जातो तो पुन्हा पुन्हा त्याचेकडेच जातो. कारण तो त्याचेशी एकरूप होतो व त्याचे वेड लागते.
सुख दुख याची क्षमता यातून मिळते हजारो लोक यात भजन कीर्तन करतात त्यात तो आनंद असतो. त्यात हे सर्व दुख लोपते. संसारामध्ये दुख असते ते ह्या परमात्म्याच्या आनंदाने, भक्तीने लोपते. निस्वार्थे भक्तीमध्ये मिळणारा आनद हा वेगळा असतो. असा हा आनंद घेत आपण दिंडीने चाललो आहोत, असे दिंडीचे महत्व सांगितले. यावेळी ग्रामस्थांचे वतीने गणेशराव मुदगुले, प्रशासक शेख, तलाठी कदम, दिनकर यादव, सोपानराव गवारे, बाळासाहेब बकाल, मुस्लीम समाजाचे वतीने इसाकभाई पठाण यांनी महंत रामगिरी महाराज यांचा सत्कार केला.
शिरसगाव येथे श्रीक्षेत्र गोदावरी धाम ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आगमन झाल्यावर शिरसगाव ग्रामस्थ व भाविक यांनी महंत रामगिरी महाराज यांचे स्वागत व सन्मान केला. त्यावेळी महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते पत्रकार बी.आर चेडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. हा जीवनातील फार महत्वाचा क्षण असल्याचे मत व्यक्त करत गोदावरी धाम व शिरसगाव मान्यवर यांचे पत्रकार चेडे यांनी आभार मानले.
यावेळी गणेशराव मुदगुले, मंदिर कमिटी अध्यक्ष फकीरचंद बकाल, उपाध्यक्ष जयराम पवार, अशोकराव पवार, शांताराम गवारे, सुभाष गवारे, मुरलीधर यादव, सुरेश ताके, कचरू बढे, सीताराम धनाड, रंगनाथ ताके, सरपंच आबासाहेब गवारे, नितीन गवारे, प्रवीण गवारे, भास्करराव ताके, पाराजी ताके, लक्ष्मणराव यादव, अब्बास शेख, इक्बाल शेख, नासीर पठाण, इसूब शेख, सत्तार शेख, मजहर कुरेशी, फय्याज शेख, जावेद शेख आदी उपस्थित होते. शहर पोलीस स्टेशन निरीक्षक गवळी व सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आरोग्य केंद्र खैरी व शिरसगाव उप केंद्र येथील डॉक्टर व सहकारी यांनी अम्बुलंस सह योग्य व्यवस्था ठेवली होती.