पाणीपट्टी दर, व्याज माफी बाबत शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
गोदावरी कालव्यांच्या कामांचा आढावा
राहाता – कालव्याद्वारे शेतीसाठी करण्यात येणाऱ्या सिंचनाच्या पाणीपट्टी दरात शासनाने केलेली वाढ तूर्तास एका वर्षासाठी मागे घेण्यात यावी व थकीत पाणीपट्टी वरील व्याज माफ करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
जलसंपदा विभागाच्या गोदावरी मराठवाडा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या गोदावरी कालव्यांच्या कामांची आढावा बैठक महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राहाता येथील पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गोदावरी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सागर शिंदे, प्रातांधिकारी गोविंद शिंदे, शिर्डी श्री. साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्यासह विविध सहकारी संस्थाचे पदाधिकारी आणि गोदावरी लाभक्षेत्रातील राहाता तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
महसूलमंत्री श्री. विखे पाटील बोलताना पुढे म्हणाले की, यावर्षी पाऊस लांबणार असल्याचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यानूसार सिंचनासाठीचे पाणी जपून वापरावे. जेणेकरून पिण्यासाठी ही पाण्याचा वापर करता येईल. शासनाच्या पाणी पुरवठ्यासाठी असलेल्या योजनांमध्ये असलेली पाणी गळीत शोधून काढण्याची गरज आहे. यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी. अशा सूचनाही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
शेतकऱ्यांना कालव्याद्वारे पूर्ण क्षमतेने पाणी मिळावे यासाठी कालवे, चारीमधील अडथळे दुरूस्त करणे व यांची देखभाल करण्याची जबाबदारी जलसंपदा अधिकाऱ्यांची आहे. प्रसंगी कालव्यांच्या साफसफाईसाठी स्थानिक ग्रामपंचायतीची मदत घेण्यात यावी. पाणी पुरवठा योजनांचे संनियंत्रण करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या पाण्याबाबतचे प्रश्न सोडवावेत, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. असेही महसूलमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कु.अंकिता भारत विधाते ह्या विद्यार्थ्यांनींचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. यावेळी तिच्या कुटुंबाला राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत ७५ हजार रूपयांच्या मदतीच्या धनादेशाचे वितरण महसूलमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. अवकाळी पावसामुळे पशुधन गमावलेले पशुपालक शेतकरी भाऊसाहेब गाडे, सोमनाथ गायकवाड आदींना यावेळी शासकीय मदतीचा धनादेश ही महसूलमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आला.