लांबे यांच्या उमेदवारीने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक रंगतदार होण्याची चिन्हे
शेतकर्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी निवडणूक लढवित असल्याची लांबे यांची माहिती

राहुरी : कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी संचालक मंडळ निवडणुक सन 2023-28 या कालावधीसाठी होणार्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुर्यभान उर्फ सुरेशराव दत्तात्रय लांबे यांनी सोसायटी मतदार संघातून इतर मागास प्रवर्गामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणुकीत रंगतदार होण्याची चिन्हे दिसून येत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर श्री. लांबे पाटील यांनी सांगितले की, आम्ही राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संपुर्ण पॅनल तयार केलेला असुन आमच्या पॅनलचा विजय निश्चित आहे. कांदा उत्पादक शेतकरी व इतर भुसार मालाला योग्य भाव मिळविण्यासाठी, शेतकऱ्यांची कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी यांच्या मार्फत व्यापाऱ्यांकडून होणारी लुट थांबविण्यासाठी व शेतीमालाला योग्य भाव मिळवुन देण्यासाठी ही निवडणुक लढवत असून या निवडणुकीत सर्व शेतकरी मतदारांचा पाठिंबा असल्याची माहिती शेतकरी नेते सुरेशराव लांबे यांनी दिली.
पुढे बोलताना श्री. लांबे म्हणाले की, आमच्या अनेक उमेदवारांवर या प्रस्थापित पुढाऱ्यांनी दबाव टाकुन त्यांना अर्ज भरण्यापासुन परावृत केले आहे. तरीही या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले असुन अनेक इच्छुक उमेदवारांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पॅनल मधुन उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशा सर्व उमेदवारांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. अर्ज छाननी प्रक्रियेनंतर अर्ज मंजुर झालेल्या उमेदवारांवर प्रस्थापित पुढा-यांकडुन विविध दबावाचे प्रयत्न होतील. तरीही कुणाच्या दबावाला बळी न पडता प्रहारच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करुन या निवडणुकीत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत नेतृत्व करणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन शेतकऱ्यांना न्याय मिळवुन द्या, असे आवाहन प्रहारचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी केले आहे.
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आमचे नेते माजी मंत्री आमदार बच्चुभाऊ कडु यांच्या आदेशानंतर योग्य जागा घेऊन इतर मंडळाबरोबर युती होईल, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढणार – सुरेशराव लांबे
यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना सुरेशराव लांबे समवेत बाळासाहेब नानासाहेब लांबे, राजाराम भाऊ लांबे, बादशाह वजीर शेख आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.