राजकीय

दिव्यांग शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचा सत्यजित तांबे यांना पाठिंबा

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : नाशिक पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना दिव्यांग शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय श्रीरामपूर येथे पार पडलेल्या संघटना पदाधिकारी बैठकीत घेण्यात आल्याची माहिती दिव्यांग शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना अध्यक्ष संजय साळवे व उपाध्यक्ष नारायण डुकरे यांनी दिली आहे.
दिव्यांग शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाचवा, सहावा व सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याच बरोबर सन 2007 ला शिर्डी यांठिकाणी महाराष्ट्रातील दिव्यांग शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व संस्था पदाधिकारी यांचे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात आले. त्यामध्ये दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व संस्था, पालक, विद्यार्थी यांचे विविध समस्या संदर्भात सविस्तर विवेचन करून प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री चंद्रकांत हंडोरे, अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या समवेत मंत्रालयात बैठक घेऊन सोडविण्यात आले.
विद्यार्थी व विद्यार्थिनी करिता आवश्यक परिपोषण अनुदान वाढविण्यासाठी, संस्थेचे इमारत भाडे, वेतनेतर अनुदान यांसाठी तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, राजकुमार बडोले, डॉ सुरेश खाडे यांच्या समवेत मंत्रालयात वारंवार बैठका आयोजित करण्यात आल्या आणि प्रश्न मार्गी लावण्यात आले. संगमनेर यांठिकाणी 18 जून 2022 रोजी ओमप्रकाश देशमुख आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांग शाळेतील शिक्षकांकरिता विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दिव्यांग शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संस्था व विद्यार्थी, पालक यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी डॉ सुधीर तांबे यांनी विशेष परिश्रम घेतले.
संघटनेचे अध्यक्ष संजय साळवे, उपाध्यक्ष नारायण डुकरे, चांगदेव खेमनर, प्रदिप भोसले, मुख्याध्यापक सुनिल कवडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाय.डि देशमुख, शिवानंद भांगरे, रमेश टिकल (अहमदनगर), महेन्द्र वाघमोडे, बाळासाहेब भुजबळ (नाशिक), अतुल पाटील, संजय सुतार (धुळे), जगदिश चौधरी, धनराज मराठे (नंदुरबार), पद्माकर इंगळे (जळगाव), डॉ संजय देशमुख (चाळीसगांव) आदी पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्षत्रिय धनगर सेवा संघ संघातर्फे राज्य सरचिटणीस रमेश टिकल यांनी देखील सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केला.

Related Articles

Back to top button