विरभद्रा नदीच्या पुरात पोहण्यासाठी गेलेला एक जण गेला वाहून
अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून वरुणराजा जोरदार हजेरी लावत असल्यामुळे पुन्हा एकदा तालुक्यातील नदी, नाले, वढ्यांना पूर आला. यामध्ये नांदर येथील विरभद्रा नदीला सुध्दा या दोन दिवसात मोठा पूर आला. दरम्यान गावातील मनोज बाळासाहेब काळे( वय २४), कार्तिक दत्तात्रय काळे (वय २०) दोघे येथील विरभद्रा नदी वरील बंधारऱ्यावर पोहण्यासाठी गेले होते. त्यातील मनोज बाळासाहेब काळे हा पुरात वाहून गेला असून कार्तिक दत्तात्रय काळे याला वाचविण्यात यश आले, मात्र मनोज काळे यास पाण्याचा अंदाज आला नसल्याने या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. गावकऱ्यांनी त्यांना वाचविण्यासाठी धावा केला. पंरतु काही क्षणात मनोज बेपत्ता झाला. याची माहिती वा-यासारखी परीसरात पसरली. तेव्हा मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी हजर झाले. अनेक ग्रामस्थांनी पाण्यात उडी घेऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. या घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच शासकीय कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य हाती घेतले असून शोध मोहीम उशीरापर्यंत सुरू होती.