कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राबविणार कृषि पारायणाची नविन संकल्पना

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधीमहात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून कृषि पारायण हि संकल्पना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यात राबविली जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दहा जिल्हे नंदूरबार, जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर हे महात्मा फुले कृृषि विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. या जिल्ह्यातील कृषि महाविद्यालये, संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्रे, विभागीय विस्तार केंद्रे, जिल्हा विस्तार केेंद्रे यांच्या सहभागातून हा कृषि पारायण उपक्रम राबवला जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे कृषि अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी यांचा सुध्दा सहभाग घेणार आहे. राज्यात प्रथमच असा तंत्रज्ञान प्रसाराचा शेतकरीभिमूख उपक्रम राबविला जाणार असल्याचे कुलगुरु डॉ. पाटील यांनी सांगितले.


कृषि पारायणाद्वारे तंत्रज्ञान प्रसार हा उपक्रम नक्की आहे तरी काय? या कृषि पारायणामध्ये जिल्ह्यातील एक गाव निवडले जाणार. या गावात त्या जिल्ह्यातील कृषि महाविद्यालय, कृषि विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे, विभागीय/जिल्हा विस्तार केंद्रातील शास्त्रज्ञांचा चमू भेट देणार आहे. त्या गावातील शेतकर्यांच्या पीक उत्पादनातील अडचणी जाणून घेणार. शास्त्रज्ञांचा चमू हा शेतकर्यांना मार्गदर्शन करणार. पण हे मार्गदर्शन नेहमीसारखे नसून एकात्मिक पध्दतीचे असणार आहे. यामध्ये त्या गावातील जमीन, हवामान कसे आहे, गावालगत एखादे मोठे शहर आहे का, त्या गावात कृषि प्रक्रिया उद्योग आहे का याचा अभ्यास करुन त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

यामध्ये मातीचे आरोग्य कसे सुधारायचे, मातीतील कर्बाचे प्रमाण कसे वाढवायचे, पाण्याचा शेतीसाठी काटेकोर वापर कसा करायचा, पाणी व्यवस्थापनाद्वारे उत्पादन कसे वाढवायचे, सेंद्रिय शेती म्हणजे काय, सेंद्रिय शेती कशी करायची, सेंद्रिय शेतीमुळे होणारे फायदे, शेती उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपाय, स्मार्ट शेती, रासायनीक खतांचा समतोल वापर, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर, रिमोट सेंन्सींग तंत्राचा शेतीमधील वापर, सूक्ष्म सिंचनाचे प्रकार, स्थानिक हवामानानुसार शेती सल्ला,फळबाग व्यवस्थापन, शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर, जनावरांसाठी वर्षभराचे चारा नियोजन, अधिक दुग्ध उत्पादनासाठी जनावरांचे व्यवस्थापन, मुक्त गोठा पध्दतीचे फायदे, देशी गोवंश व्यवस्थापन, मुरघास तंत्रज्ञान, शेळीपालन तंत्रज्ञान, पुर्वमशागतीचे अवजारे, शेतीचे यांत्रिकीकरण, कृषि माल प्रक्रिया, मुल्यवर्धन अशा विविध विषयांवर दिवसभर कृषि शास्त्रज्ञ शेतकर्यांना मार्गदर्शन करतील व त्यांच्याशी संवाद साधतील. 

हा कृषि पारायण उपक्रम सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील थोर कवी कै. ग.दि. माडगुळकर यांचे जन्मगाव शेटफळे या गावातून सुरु करण्यात येणार आहे. या परिसरातील डाळिंब बागांवर मोठ्या प्रमाणात आलेल्या मर रोगासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी दि.21 सप्टेंबर, 2021 रोजी डॉ. अनिल दुरगुडे, डॉ. अशोक वाळुंज, डॉ. देवेंद्र इंडी, डॉ. प्रकाश मोरे या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या चमूने मर रोगग्रस्त डाळिंब बागांना भेटी दिल्या, शेतकर्यांना मार्गदर्शन केले, यानंतर त्या गावातील सभागृहामध्ये डाळिंब बागायतदार शेतकर्यांना डाळिंब बाग व्यवस्थानासंदर्भात मार्गदर्शन केले. या कृषि पारायणाच्या संकल्पनेची गरज विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना भेट दिल्यानंतर जाणविली. कृषि पारायण हा उपक्रम सांगितल्यानंतर शेतकर्यांनी याचे स्वागत केले.  
राज्यातच नव्हे तर देशात कृृषि पारायण हा शेतकरीभिमूख तंत्रज्ञान प्रसाराचा कार्यक्रम  प्रथमच आम्ही राबविणार आहोत. यासाठी जिल्हानिहाय शास्त्रज्ञांचा चमू बनवून हा प्रत्येक हंगामातील एक दिवस एक गाव प्रति जिल्हा तंत्रज्ञान प्रसारासाठी घेणार आहे. अशा उपक्रमामुळे शेतकर्यांना शेती करण्याचे शास्त्रीय ज्ञान मिळेल व त्यांच्या उत्पन्नात वृध्दी होईल.
कुलगुरु डॉ. पी.जी पाटील

Related Articles

Back to top button