नांदर येथील तलाठी सोनवणे यांची बदली तात्काळ थांबवा
तलाठी सोनवणे यांच्या बदली संदर्भात निवेदन देताना छावाचे राज्य सरचिटणीस अनिल पाटील राऊत सह आदी पदाधिकारी. |
छावा क्रांतिवीर सेनेची मागणी
विलास लाटे/पैठण : नांदर मंडळ हे पैठण तालुक्यातील एक मोठे मंडळ असून या नांदर गावातील सध्या कार्यरत तलाठी रमेश सोनवणे यांची प्रशासनाने बदली केली असून ती तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी नुकतीच छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने पैठणचे तहसीलदार यांना निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद असे की, कोरोना काळात सुद्धा तलाठी सोनवणे यांनी नांदर या मुख्यालयी ठिकाणी वास्तव्य करुन शेतकरी आणि सामान्य जनांना सेवा पुरविली आहे. असे कार्य करणारे कर्मचारी फार थोडे असुन त्यापैकी एक तलाठी सोनवणे यांच्याकडे पाहिले जाते. कारण त्यांच्या कार्यकाळात कुठल्याही प्रकारची तक्रार आली नाही. शेतकऱ्यांचे वेळेवर कामे झाली आहे. तलाठी सोनवणे यांच्याकडून देण्यात येणाऱ्या महसूल सेवा विषयी नांदर मधील शेतकरी समाधानी आहे. त्यामुळे समस्त शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन, सोनवणे यांची होणारी बदली तात्काळ रद्द करण्यात यावी असे निवेदन छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने देण्यात आले आहे.
यावेळी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे, मराठवाडा सचिव भगवान सोरमारे, भीमशक्ती तालुकाध्यक्ष अनिल मगरे आदी उपस्थित होते.