छत्रपती संभाजीनगर
पाऊस आला धावून, पुल गेला वाहून
शिवणी-बोकुड जळगावचा संपर्क तुटला
विलास लाटे/ पैठण : तालुक्यातील शिवणी येथे मंगळवार (दि.७) रोजी रात्री सात-साडेसात वाजेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने बोकुड जळगाव- शिवणी रस्त्यावरील दोन्ही गावांना जोडणारा नळकांडी पुल, नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने शेतकरी तसेच नागरीकांना वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.
हा पुल तुटल्याने बोकुड जळगाव तसेच परीसरातील गावे, तांडे, वस्त्या यांचा बिडकिन या मोठ्या बाजार पेठे पासून संपर्क तुटला आहे. या पुलावरून शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते. पुल वाहून गेल्यामुळे शेतकरी व नागरीकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिवनई-जळगाव रस्त्यावरील हा पूल २००९ साली वाहून गेला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी तो पुल लोकवर्गणीतून बांधला होता. त्यातच काल मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला मोठा पुर आला. या पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात हा पुल पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. येथून जवळच असलेल्या शिवणी लघू प्रकल्पाचे बॅक वॉटर क्षेत्र या पुलाच्या पाठीमागे दोनशे फुटापर्यंत येते. त्यामुळे येथे कायम पाणी साचलेले असते. अशा परिस्थितीत येथून शेतकऱ्यांना शेतीसाठी तसेच वाहतुकीसाठी दळणवळणासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. याप्रश्नी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष वेधून हा पुल त्वरित दुरुस्त करून द्यावा अशी मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य अशोक काळे, शिवराम काळे, गणेश काळे आदींनी केली आहे.
कही खुशी कही गम…काल झालेल्या मुसळधार पावसाने एकीकडे शिवणी लघू प्रकल्प एकाच पावसात ८० टक्के भरला असल्याचा आनंद येथील शेतकरी तसेच नागरीकांना झाला असला तरी दुसरीकडे गावातील जळगाव-शिवणी रस्त्यावरील पुल वाहून गेल्याने त्याचे दुःख सुद्धा झाले आहे. त्यामुळे कही खुशी कही गम अशी अवस्था येथील नागरिकांत पाहावयास मिळत आहे.
खरीप पिकांचेही मोठे नुकसान…काल तालुक्यात जवळपास सर्वत्र पावसाने धुव्वाधार बॅटीग करत नदीनाले एक केले. यावर्षीच्या पावसाळ्यातील मोठ्या प्रमाणात पडलेला बहुतेक हा पहिलाच पाउस आहे. यामुळे विहीरी, बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे. परंतु या मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान देखील झाले आहे.