आरोग्य
लंपी आजार व औषधोपचाराविषयी माहिती
१. हा रोग गाई म्हशींना विषाणूमुळे होतो. या रोगात गाई म्हशींच्या त्वचेवर १ ते ५ सें.मी. व्यासाच्या गाठी येतात. चावणा-या माशा, डास, गोचिड, किटक, चिलटे इ. बाह्य परोपजीवी या रोगाचा मुख्यत्वे प्रसार करतात.
२. लंपी त्वचा रोग हा सन १९२९ ते १९७८ या काळात मुख्यत्वे आफ्रिकेत आढळत होता. नंतर हळूवारपणे हा रोग आजू बाजूच्या देशांत प्रसार झाला.
३. हा रोग युरोप व आशिया खंडात जलदगतीने प्रसार होत आहे.
४. भारतात लंपी त्वचा रोग ऑगस्ट २०१९ मध्ये ओरिसा राज्यात दिसून आला. त्यानंतर झारखंड, पच्छिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व केरळ राज्यात हा रोग प्रसार झालेला आहे.
५. महाराष्ट्रात सिरोंचा, जि. गडचिरोली येथे मार्च २०२० पासून हा रोग दिसून आला आहे.
६. या रोगाचे पक्के निदान राष्ट्रीय रोग निदान प्रयोगशाळा भोपाळ येथे करण्यात आलेले आहे.
- लंपी त्वचा रोगाचा परिचय
- लंपी त्वचा रोगाची लक्षणे
१. बाधीत जनावर साधारण २ ते ५ आठवडे लंपी त्वचा रोगाची कोणतीही बाह्य लक्षणे दाखवत नाही. याला रोगाचा सुप्त काळ म्हणतात.
२. या आजारात जनावरास प्रथम तिव्र स्वरुपाचा ताप येतो. त्यानंतर डोळ्यातून अश्रू व नाकातून स्राव सुरु होतात.
३. लसीकाग्रंथींना ( लिम्फ नोड्स ) सूज येते.
५. डोके, मान, पाय, छाती, पाठ, मायांग, कास, इ. भागावरील त्वचेवर हळू हळू १ ते ५ सें.मी. व्यासाच्या गाठी येतात.
६. काही वेळा तोंडात, नाकात व डोळ्यात व्रण येतात.
७. तोंडातील व्रणांमुळे जनावरास चारा चघळण्यास व रवंथ करण्यास त्रास होतो.
८. डोळ्यांतील व्रणांमुळे चिपडे येउन पापण्या चिकटून दृष्टी बाधीत होते.
९. या आजारात जनावराला फुफ्फुसदाह, स्तनदाह देखिल होतो. कारणे फुफ्फुसदाहामुळे जनावराला श्वसनास त्रास होतो व धाप लागते.
१०. रक्तातील पांढ-या पेशी व प्लेटलेट्स पेशी कमी होतात कारणे जनावरास अन्य जिवाणूजन्य आजार होउ शकतो.
११. पायावर सुज आल्याने जनावर लंगडते.
- लंपी त्वचा रोगाचा प्रसार
१. लंपी त्वचा रोगाचे विषाणू चावणा-या माश्या ( उदा. स्टोमॉक्सिस ), गोचिड, चिलटे ( उदा. क्युलिकॉईडस्स ) यांच्या मार्फत एका जनावराकडून दुस-या जनावराच्या शरीरात प्रवेश करतात कारणे या रोगाचा वेगाने प्रसार होतो.
२. निरोगी जनावराचा रोगी जनावराशी स्पर्श आल्याने देखिल रोगाचा प्रसार होतो.
३. रोगी जनावराच्या नाकातील, डोळ्यातील, तोंडातील, गर्भपात झालेल्या जनावराचे गर्भाशयातचे स्राव इ. मध्ये विषाणू असतात. सदर स्राव पाणी, चारा व खाद्य दुषित करतात. अश्या दुषित चारा, पाणी व खाद्या मार्फत देखिल रोगाचा प्रसार होतो.
४. त्वचेवर आलेल्या गाठींचे रुपांतर जखमेत होते. कालांतराने जखम सुकते व जखमेची खपली गळून पडते. अश्या खपलीत अंदाजे ५ ते ६ आठवडे विषाणू जिवंत राहतात.
५. रोगी नराच्या विर्यात विषाणू आढळून येत असल्याने अश्या नराचा संयोग आल्याने देखिल मादीत रोगाचे संक्रमण होऊ शकते.
६. गाभण जनावराचा या रोगात गर्भपात होउ शकतो व जन्माला येणा-या वासरास देखिल रोगाचे संक्रमण होऊ शकते.
७. दुघ पिणा-या वासरास आजारी गायीच्या दुधातून अगर स्तनावरील जखमेतील स्त्रावातून देखिल रोगाचे संक्रमण होऊ शकते.
- लंपी त्वचा रोगाची कारणे व प्रादुर्भाव
१. हा विषाणूजन्य साथीचा आजार असून या आजारात गाई म्हशीला ज्वर व त्वचेवर गाठी दिसून येतात, या रोगाचा प्रसार चावणा-या माशा, डास, गोचिड, किटक, चिलटे इ. बाह्य परोपजीवींकडून एका जनावरापासून दुस-या जनावराला होतो.
२. या रोगाचे विषाणू देवी कुटंबातील व कॅप्रीपॉक्स जातीचे असतात.
४. या रोगाची तिव्रता पाठीवर वशिंड असलेल्या ( झेबू वंश उदा. भारतीय गोवर्ग ) गोवर्गात कमी असते तर पाठीवर वशिंड नसलेल्या ( युरोपियन वंश उदा. जर्सी, हॉस्टेन फ्रझियन गोवर्ग ) गोवर्गात जास्त असते.
५. लंपी त्वचा रोग सर्व वयोगटाती ( नर व मादी ) जनावरांत आढळतो. परंतू लहान वासरांत प्रौढ जनावरांच्या तुलनेत प्रमाण जास्त असते.
६. उष्ण व दमट हवामान, शेती, गवत व पाण्याची डबकी यामुळे परोपजीवी चावणा-या किटकांची वाढ होते. अश्या वेळी या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो.
७. लंपी त्वचा रोगाचा दर १० ते २० % तर मृत्यूदर १ ते ५ % असतो. काही वेळा रोगाचा दर ४५ % पर्यंत देखिल आढळून आला आहे.
८. लंपी त्वचा रोगात मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी रोगी जनावर अशक्त होत जाते, त्याचे दुग्ध उत्पादन कमी होते, ओढकाम करु शकत नाही, गाभण जनावराचा गर्भपात होऊ शकतो. कारणे पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान होते.
- लंपी त्वचा रोगाचे प्रयोगशाळेत पाठवणे व निदान करणेसाठी गोळा करावयाचे नमुने
१. २ ते ३ मिली रक्तजल – ४ ° से. ग्रेट तापमानात ( बर्फावर )
२. इडीटीए मिश्रीत ५ मिली रक्त- ४ ° से.ग्रेट तापमानात ( बर्फावर )
३. त्वचेवरील गाठीचा नमुना अगर त्वचेवरील जखमेवरील खपली व्हायरल ट्रान्सपोर्ट मेडीयम / फॉस्फेट बफर सलाईन मध्ये – ४ ° से.ग्रेट ते २० ° से.ग्रेट तापमानात ( बर्फावर )
४. नाकातील, डोळ्यातील, तोंडातीव व्रणाचा स्वब – व्हायरल ट्रान्सपोर्ट मेडीयम / फॉस्फेट बफर सलाईन मध्ये – ४ ° से.ग्रेट तापमानात ( बर्फावर )
५. विर्य व्हायरल ट्रान्सपोर्ट मेडीयम / फॉस्फेट बफर सलाईन मध्ये – ४० से.ग्रेट तापमानात ( बर्फावर )
- औषधोपचार
१. लंपी त्वचा रोगाची लक्षणे दाखवणारे जनावर दिसून आल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधुन जनावरावर उपचार करुन घ्यावेत.
३. जनावरास जिवाणूजन्य रोगाचा दुय्यम संसर्ग होऊ नये म्हणून पशुवैद्यकाकडून प्रतिजैवक औषध टोचून घ्यावे.
४. त्वचेवरील गाठीचे जखमेत रुपांतर झाल्यास, जखमेत आळ्या पडू नयेत म्हणून पशुवैद्यकाकडून औषधोपचार करुन घ्यावेत व जखमेवर मलम लावावे.
- लंपी त्वचा रोगाचे नियंत्रण
१. या रोगाचा प्रादुर्भाव सहसा मानवास होत नाही. बाधीत जनावर हाताळणा-या पशुवैद्यकाने, शेतक-याने जैव सुरक्षा साधनांचा उपयोग करावा. हातात रबरी हातमोजे घालावेत. बाधीत जनावराच्या दुधाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. दुध नेहमीच उलळून थंड केल्यावर पिण्यास वापरावे. दुध पाच्छराईझ करुन वापरावे.
२. साबण, डेटॉल, अल्कोहोल मिश्रीत निर्जंतूकीकरण द्रावणाचा, हात निर्जंतूकिरण करणेसाठी वापर करावा.
३. गोठा परिसर स्वच्छ व हवेशीर ठेवावा. परिसरात पाणी साठणार नाही, दुर्गंधी होणार नाही व किटक येणार नाहीत यासाठी दक्षता घ्यावी.
४. शेण खोल खड्यात अगर गोबर गॅस टाकीत टाकावे.
५. गोमुत्र शोषखड्यात सोडावे.
७. आजारी जनावरांना व त्यांच्या संपर्कातील जनावरांना आयवरमेक्टीन इंजेक्शन दिल्याने किटकांचे नियंत्रण होते परिणामी या रोगाचे नियंत्रण होते असे दिसून आलेले आहे.
८. सद्यस्थितीत भारतात लंपी त्वचा रोगाची लस उपलब्ध नाही. शेळ्यांची कॅप्रीपॉक्स ( उत्तर काशी स्ट्रेन ) लस वापरुन या रोगाचे नियंत्र करता येते. साथ रोग सुरु असताना बाधीत गावांत व ५ कि.मि. त्रीज्येच्या क्षेत्रातील गावांत लसीकरण करण्यात यावे. केवळ निरोगी जनावरास लसीकरण करावे. लसीकरण करताना प्रत्येक जनावरासाठी नविन सुई वापरावी.
९. आजारी जनावराचे निरोगी जनावरांपासून विलगिकरण करावे.
१०. आजारी व निरोगी जनावरे एकाच ठिकाणी चरावयास अगर पाण्यावर सोडू नयेत.
११. डास, चावणा-या माश्या, चावणारे किटक इ. दुर करणारी अनेक नैसर्गिक औषधे व फ्लाय फ्रायर यंत्र यांचा वापर करावा.
१२. गोठ्यात पहाटे व सायंकाळी डास मोठ्या प्रमाणात शिरकाव करतात, अश्यावेळी मडक्यात सुके शेण जाळून धुर करावा. अश्यावेळी निलगिरी तेल, कापुर, भांबरुड झुडूपाची पाने, करंज तेल, कडूनिंब तेल, गवती चहाची पाने इ. चा वापर केल्यास डास गोठ्यातून दुर पळून जातात.
१३. जनावरांना चरायला सोडण्यापुर्वी अंगावर करंज तेल, कडूनिंब तेल लावल्यास किटक चावत नाहीत.
१४. साथ रोग सुरु असताना महिष वर्गीय जनावरे गोवर्ग जनावरांपासून स्वतंत्र बांधावीत.
१५. साथ रोग सुरु असताना १० कि.मि. त्रिज्येच्या क्षेत्रातील जनावरांचे बाजार बंद करावेत, जनावरांचे मेळावे व प्रदर्शने आयोजित करु नयेत.
१६. बाधीत क्षेत्रातील जनावरांचे गोठे, परिसर, खाद्य भांडी, पाणी भांडी, हत्यारे, यंत्र सामुग्री हि, योग्य औषधी उदा. २० % इथर, १ % क्लोरोफॉर्म, १ % फॉरमॅलिन, २ % फिनॉल, २% सोडियम हायपो क्लोराईड, आयडीन द्रावण, क्वार्टरनरी अमोनिया द्रावण इ. चा वापर करुन निर्जंतूक करावी.
१७. या रोगाची लक्षणे दाखवणारे जनावर आढळून आल्यास पशुपालकाने, ग्रामसेवकाने, तलाठ्याने, लोक प्रतिनिधीने अगर गावातील अन्य कोणत्याही व्यक्तीने याची खबर तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकाला द्यावी. म्हणजे तातडीने पशुवैद्यकीय उपचार करणे, रोगाचे निच्छित निदान करणे, रोग नियंत्रणात आणणे, रोगाचा प्रसार रोखणे इ. कार्यवाही करणे शक्य होईल.
१८. या रोगांत मयत झालेले जनावर ८ फुट खोल खड्यात शास्त्रोक्त पद्धतीने दफन करावे.
१९. या रोगाची संपुर्ण माहिती जास्तीत जास्त पशुपालकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रचार व प्रसिद्धि करण्यासाठी ही बातमी शेअर करण्यात यावी.