छत्रपती संभाजीनगर
पाझर तलावामध्ये बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू; “पैठण तालुक्यातील खंडाळा येथील दुर्दैवी घटना”
पाचोड /प्रतिनिधी : गायरान जमीनी वरील तुडुंब भरलेल्या पाझर तलावमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या चौथीच्या दहा वर्षीय शाळेतील मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पैठण तालुक्यातील खंडाळा येथे (दि.२) सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्यान उघडकीस आली आहे.गणेश जगन्नाथ आगळे ( वय१० वर्ष) असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, गणेश हा यंदा चौथीच्या वर्गात शिक्षण घेत होता. परंतु सध्या शाळा आँनलाईन सुरू असल्यामुळे तो सकाळी दहाच्या दरम्यान शेळी चारण्यासाठी स्वतःच्या शेतात घेऊन गेलेला होता. परंतु यंदा सर्वत्र पावसाळा मुबलक झालेला असल्याने त्यांच्या शेता जवळील पाझर तलाव तुडूंब भरलेला होता. त्यामूळे गणेशला पोहोण्याचा मोह आवरला नाही अन् त्याने कपडे पाझर तलावाच्या काठेवर काढून पाझर तलावात पोहोण्यासाठी उडी मारली, मात्र पाण्यात उडी मारल्या नंतर त्यांच्या नाका तोंडात पाणी जावून तो पाण्यात बुडाला.
दुपारी वडिल जगन्नाथ आगळे हे शेतात गेले असता त्यांना शेळी एका झाडाला बांधल्याचे दिसून आले. त्यावेळी, त्यांनी गणेशला परिसरात शोधत-शोधत पाझर तलावाजवळ आल्यावर त्यांना गणेश चे कपडे तिथे दिसून आले. यावेळी त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती गावातील नागरिकांना देऊन गावकऱ्यांच्या सहाय्याने गणेश ला पाझर तलाव्याच्या बाहेर काढून गावकऱ्यांच्या मदतीने यास तात्काळ विहामांडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यांमध्ये आकस्मित मृत्यू म्हणून करण्यात आली असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष खरड पोलीस कर्मचारी माळी हे करीत आहे.