प्रहार विकासाच्या मुद्यावर समविचारी पक्षांसोबत; राहुरी-देवळाली प्रवरा नगरपालिकेत ताकदीने उतरू – सुरेशराव लांबे पाटील

राहुरी (प्रतिनिधी) – आगामी राहुरी व देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाने विकासाला केंद्रस्थानी ठेवत समविचारी राजकीय पक्षांसोबत निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष व शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी दिली.
लांबे पाटील म्हणाले की, “सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करत अनेक वर्षे नगरपालिका व जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुका न घेता प्रशासक राजवट कायम ठेवली. पाच वर्षे निवडणुका लांबवून कार्यकर्त्यांवर अन्याय केला आणि विकासकामांना खंड पाडला.”
ते पुढे म्हणाले, “अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, कांदा व इतर पिकांचे लाखोंचे नुकसान झाले. मात्र सरकारने दिलेली तुटपुंजी भरपाई म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून प्रहारचे नेते बच्चूभाऊ कडू यांनी विविध आंदोलनांद्वारे शेतकरी, दिव्यांग आणि सर्वसामान्यांसाठी संघर्ष केला. त्यामुळे राहुरी शहरात प्रहारला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे.”
नगरपालिका निवडणुकीत नागरिकांसाठी शुद्ध व नियमित पिण्याचे पाणी, सुसज्ज आरोग्य सेवा, गरीबांसाठी मोफत उच्च शिक्षण, सांडपाणी व गटार व्यवस्था, सुसज्ज रस्ते, शहरात खरेदीसाठी येणाऱ्या ग्रामीण नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालय व्यवस्था आदी विकासाच्या मुद्द्यांवर प्रहार पक्ष भूमिका मांडणार आहे.
“या सर्व जनहिताच्या मुद्यांवर प्रहार जनशक्ती पक्ष समविचारी पक्षांसोबत ताकदीने निवडणूक लढवणार,” असे स्पष्ट वक्तव्य लांबे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले.


