राजकीय

संपूर्ण ताकदीने मैदानात उतरणार – शहराध्यक्ष प्रतिक विधाते

राहुरी प्रतिनिधी : राहुरी नगरपालिका निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर मनसेने रणशिंग फुंकले असून मनसे शहराध्यक्ष प्रतिक विधाते यांनी राहुरीत संपूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मनसेने शहरातील राजकीय समीकरणांना अनपेक्षित वळण देत मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

शहराध्यक्ष विधाते म्हणाले, “राहुरीत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि रोजगारनिर्मिती या मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. नागरिक त्रस्त आहेत. आम्ही जनतेच्या मनात असलेली नाराजी आणि अपेक्षा ओळखून मैदानात उतरत आहोत. मनसे संपूर्ण शक्तीने निवडणूक लढवेल आणि नागरिकांच्या विश्वासावर झेंडा फडकवेल.”

ते पुढे म्हणाले, “मनसेचे धोरण स्पष्ट – स्वच्छ प्रशासन, पारदर्शक कारभार व लोकाभिमुख निर्णय. आमचे कार्यकर्ते महिन्यांपासून जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत. आज जनता पर्याय शोधत आहे आणि तो पर्याय म्हणजे मनसे.” मनसेच्या तत्त्वांवर विश्वास ठेवणाऱ्या, समाजात काम करणाऱ्या आणि बदल घडवण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींनी पक्षाशी संपर्क साधावा. योग्य आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. राहुरीत तरुण नेतृत्व घडविण्याचा आमचा संकल्प आहे.

दरम्यान, राहुरी शहरात निवडणुकीची तापती चाहूल लागली असून मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये “या वेळी मनसे काय वेगळं करणार?” असा प्रश्न उपस्थित होत असून सर्वच पक्ष मनसेच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. राहुरीच्या राजकारणात मनसे नव्या समीकरणांची निर्मिती करणार का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button