महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्त भरतीच्या जाहिरातीस मुदतवाढ

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी कार्यक्षेत्रातील अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी या प्रकल्पाकरिता ज्यांच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित झालेल्या आहेत, अशा प्रकल्पग्रस्त कुटुंबातील उमेदवारांसाठी सरळसेवेने रिक्त पदावर भरती संदर्भात दि. 31 डिसेंबर, 2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती.
सदरील जाहिरातीसाठी विविध पदांकरिता अर्ज करण्यासाठी दि. 30 जानेवारी, 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. यानंतर पुन्हा दोन वेळेस मुदतवाढ देण्यात येवून दि. 24 मार्च, 2025 पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकपर्यंत काही विद्यापीठ प्रकल्पग्रस्त यांना मुदतीत प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र न मिळाल्याने अशा प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी संबंधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे कार्यालयास प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळणेबाबत अर्ज सादर केले बाबतची पोहोच पावती त्यांचे अर्जासोबत सादर केली होती. अशा उमेदवारांना दि. 30 जून, 2025 पर्यंत प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर करण्याची संधी देण्यात आली होती.
दि. 30 जून, 2025 रोजी मा. मंत्री, कृषि यांचे मंत्रालयातील दालनामध्ये झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार विद्यापीठ प्रकल्पग्रस्त उमेदवारांना गट क व गट ड या दोन्ही गटातील पदांसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली असून त्यासाठी दि. 7 जुलै, 2025 पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच दि. 7 जुलै, 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्राप्त झालेल्या अर्जांचाच विचार केला जाईल. त्यानंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही. त्याचप्रमाणे टपालाने विलंब झाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही. असे प्राप्त झालेले अर्ज अपात्र ठरविण्यात येतील, याची संबंधित विद्यापीठ प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी नोंद घ्यावी असे महात्मा फुले कृषि विद्यापीठ प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.