शेतकरी कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी 24 जुलै रोजी राहुरीत चक्काजाम आंदोलन – सुरेशराव लांबे पाटील

राहुरी : कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांचे कैवारी दिव्यांगाचे नेते बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांची कर्जमाफीसह शेतमालाला हमीभाव व इतर मागण्यांसाठी येत्या गुरुवारी, दिनांक 24 जुलै 2025 रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत राहुरी बाजार समितीच्या समोर नगर मनमाड रोड वर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात राहुरी तालुक्यासह राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूर कामगार, दिव्यांग, मेंढपाळ यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी केले आहे.
या मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व राहुरी तहसीलदार यांना देण्यात आले. सरकारने निवडणुकीच्या अगोदर शेतकरी कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पाळले नाही, म्हणून गेल्या दोन महिन्यापासून बच्चुभाऊ कडू यांनी मोझरी येथे अन्नत्याग उपोषण आंदोलनासह १३८ कि.मी. अमरावती ते यवतमाळ पदयात्रा करून शेतकऱ्यांचा ७/१२ उतारा कोरा करण्यासाठी विविध आंदोलन केले.
परंतु गेंड्याच्या कातडीच्या या सरकारला जाग यावी यासाठी पुन्हा येत्या २४ जुलै, गुरुवार रोजी राहुरी सह संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे, या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे सह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार असून, राहुरी तालुक्यातील मेंढपाळ, शेतकरी, शेतमजूर कामगार,दिव्यांग, यांनी या न्याय हक्काच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले.
यावेळी जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, तालुका अध्यक्ष योगेश लबडे, उपाध्यक्ष विजय म्हसे, तालुका सल्लागार बाबुराव शिंदे, चंद्रकांत रेबडे, महेश शेलार, रमेश शेलार, जुबेर मुसानी, विजय सूर्यवंशी, फिरोज मन्सुरी, संजय देवरे, प्रहार युवा चे अध्यक्ष ऋषिकेश ईरुळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.