हाडांचा ठिसूळपणा व हिमोग्लोबिन तपासणीसाठी मोफत आरोग्य शिबिर – ६ जुलै रोजी श्रीरामपूर येथे आयोजन

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, तसेच वेळीच आवश्यक निदान होऊन गंभीर आजारांपासून बचाव करता यावा यासाठी श्रीरामपूर शहरात एक उपयुक्त व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. केअर फोर सोसायटीज हेल्थ श्रीरामपूर, त्रिमूर्ती आयुर्वेदिक संशोधन व विकास संस्था, तसेच श्री आयुर्वेद अँड हर्बल कॉस्मेटिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर रविवार, दिनांक ६ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर श्री आयुर्वेद अँड हर्बल कॉस्मेटिक, हरी कमल प्लाझा, नगरपरिषद शेजारी, श्रीरामपूर येथे होणार आहे.
या शिबिरामध्ये हाडांचा ठिसूळपणा (Bone Mineral Density – BMD) तपासण्यासाठी अत्याधुनिक बीएमडी मशीनद्वारे तपासणी केली जाणार आहे. विशेषतः ज्यांना सतत पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, संधिवात, सांधेदुखी, टाचदुखी, मणक्याचे त्रास, हात-पायाला मुंग्या येणे, अशक्तपणा किंवा सतत अंगदुखी अशा तक्रारी आहेत, अशा नागरिकांनी हे शिबिर नक्कीच गाठावे, असे आयोजकांचे आवाहन आहे. हाडांचा ठिसूळपणा हा वयोमानानुसार किंवा काही विशिष्ट आरोग्य स्थितींमुळे वाढणारा गंभीर त्रास असून त्याकडे वेळेवर लक्ष दिल्यास भविष्यातील गुंतागुंत टाळता येते.
याशिवाय, आवश्यकतेनुसार हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी देखील पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. आजकालच्या जीवनशैलीमध्ये हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवत असून यामुळे थकवा, चक्कर येणे, कार्यक्षमता कमी होणे यासारख्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे महिलांनी व किशोरवयीन मुलींनी यामध्ये सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे.
या शिबिरात तज्ञ एम.डी. आयुर्वेद डॉक्टरांद्वारे थेट तपासणी व सल्ला दिला जाणार असून, गरजेनुसार पुढील उपचारांची माहिती व आरोग्यविषयक मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाईल. पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतीच्या आधारे समुपदेशन व निदान यातून नागरिकांना संपूर्ण आरोग्यसुरक्षेचा लाभ मिळणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन केअर फोर सोसायटीज हेल्थच्या अध्यक्षा सौ. प्रिया शहा, उपाध्यक्षा सौ. निशा सरोदे, तसेच त्रिमूर्ती आयुर्वेदिक संशोधन व विकास संस्था व श्री आयुर्वेद अँड हर्बल कॉस्मेटिकचे संचालक सौ. सोनल त्र्यंबके, संदीप त्र्यंबके व सुभाष कुरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. त्यांनी सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
हे शिबिर पूर्णपणे मोफत असून, नावनोंदणीसाठी ९८५००६१७६४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना प्राथमिक स्वरूपात आपले आरोग्य तपासण्याची व वेळेवर आवश्यक त्या उपचारांची माहिती घेण्याची उत्तम संधी प्राप्त होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन आयोजक संस्थांकडून करण्यात आले आहे.