धार्मिक

महंत रामगिरी महाराज यांच्या कीर्तनाने मूर्ती प्राणप्रतिष्ठा व पारायण सोहळ्याची सांगता

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे) : शिरसगाव येथील रामकृष्णनगर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री गणेश, श्री महादेव व नंदी, श्री विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता महंत रामगिरी महाराज यांच्या कीर्तनाने व महाप्रसादाने भक्तिमय वातावरणात पार पडली.

महंत रामगिरी महाराज यांनी कीर्तनातून प्राणप्रतिष्ठेचे महत्त्व सांगत सगुण-निर्गुण परमात्म्याच्या तत्त्वांचे विवेचन केले. ते म्हणाले, “परमात्मा हा निराकार असला तरी भक्तांच्या कल्याणासाठी सगुण रूप धारण करतो. मंदिरात मूर्तीपूजेच्या माध्यमातून भक्तांना भक्तीमार्गाचा लाभ मिळतो. ही परंपरा आपली आध्यात्मिक संस्कृती समृद्ध करणारी आहे.”

पुढे बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले की, आज येथे सुंदर मंदिर स्थापित झाले त्याचा मला आनंद होत आहे. या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा म्हणजे मूर्तीमध्ये प्राणाची स्थापना. या दिवसाचे आव्हान केले जाते व स्थापना करून पूजन केले जाते. अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठेचे वैदिक परंपरागत विधी असतो. परमात्मा तर निराकार आहे, पण तो साकारही होऊ शकतो. भगवंताची ती दोन्ही रूपे आहेत. पाण्याचे बर्फ होते, त्याचे रुपांतर घनरूपात होते, जल पाण्याचे द्रवरूप आहे, वाफ वायुरूप आहे, तर परमात्मा सगुण निर्गुण का बनू शकत नाही, निर्गुण हे जरी त्याचे रूप असले तरी भक्ताचे रक्षणासाठी तो परमात्मा सगुण बनतो. त्या परमात्म्याला सगुण रूपाने मूर्तीतून भजतात. परमेश्वराचे रूप हे मनाच्या पलीकडे आहे, त्यासाठी सगुण उपासनेची आवश्यकता आहे. एकच तत्व आहे भक्तांकरिता सुख मिळते. भवसागर तारण्याची चिंता करू नका भगवंत पलीकडे उभा आहे. हे जाणा. हे मंदिर आज झाल्यापासून सर्वांनी तेथे पूजापाठ, नैवेद्य या गोष्टी कराव्यात व सर्वांनी या मंदिराचा, दर्शनाचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी सांगता कीर्तनप्रसंगी केले.

दि. २७ जानेवारीपासून सुरू झालेल्या या सोहळ्यात शिवलीलामृत पारायण, धार्मिक विधी, मूर्तींच्या मिरवणुका आणि कलशारोहण यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दि. ३१ जानेवारी रोजी ह.भ.प. भगवान महाराज जंगले शास्त्री यांच्या हस्ते विविध मूर्तींची तसेच मंदिरावरील तीन कलशांची विधिवत पूजा करून कलशारोहण संपन्न झाले. या सोहळ्यास माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, चेअरमन पुष्पाताई आदिक, जयंतराव चौधरी, वंदनाताई मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे, मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे, अरुण नाईक, बाबासाहेब दिघे, सचिन गुजर, आशिष बोरावके, डॉ. राजीव शिंदे, अमरनाथ जगदाळे, आशिष धनवटे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सोपानराव गवारे, नितीन गवारे मित्रमंडळ तसेच शिरसगाव, ब्राम्हणगाव, वळदगाव, वडाळा महादेव, तसेच सद्गुरू नारायणगिरी गुरुकुल बाभळेश्वर, भजनी मंडळ, लक्ष्मी त्रिंबक समाज विकास प्रतिष्ठान, साई प्रतिष्ठान, नर्मदेश्वर प्रतिष्ठान, संभाजीनगर व समस्त ग्रामस्थ शिरसगाव आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता फासाटे यांनी केले, तर नितीन गवारे यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button