शिरसगाव येथे भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा व कीर्तन सोहळा
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे) : तालुक्यातील शिरसगाव येथील रामकृष्णनगर विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात दि. २७ जानेवारीपासून मूर्ती प्राणप्रतिष्ठा व शिवलीलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांसह कीर्तन, भजन, मिरवणुका यामुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने भारावून गेले आहे.
दि. २८ जानेवारी रोजी श्री गणेश, श्री महादेव व नंदी, श्री विठ्ठल-रुख्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींची वाद्यांसह मिरवणूक काढण्यात आली. भक्तगणांनी फुगडी, भजन व हरिपाठ करत मिरवणुकीत सहभाग घेतला. दि. ३१ जानेवारी रोजी ह.भ.प. भगवान महाराज जंगले शास्त्री यांच्या हस्ते विधीवत पूजेने मुर्तींची प्राणप्रतिष्ठा व मंदिरावरील तीन कलशांचे कलशारोहण करण्यात आले.
यावेळी ह.भ.प. भगवान महाराज जंगले शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांचा विचार मांडत सांगितले की, “परमार्थ एकाचे निमित्ताने येतो, तो एकासाठी नसून सर्वांसाठी असतो.” त्यांनी शिरसगाव येथे नव्याने उभे राहिलेले मंदिर भक्तांसाठी एक मोठे आध्यात्मिक केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त केला. उद्या सकाळी १० वा. महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
या भव्य धार्मिक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन माजी पोलीस पाटील सोपानराव गवारे, नितीन गवारे, शिरसगाव, ब्राम्हणगाव, वळदगाव, वडाळा महादेव, सद्गुरू नारायणगिरी गुरुकुल बाभळेश्वर, भजनी मंडळ, लक्ष्मी त्रिंबक समाज विकास प्रतिष्ठान, साई प्रतिष्ठान, नर्मदेश्वर प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ शिरसगाव यांच्या वतीने सर्व भक्तगणांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.