महात्मा फुले कृषि विद्यापीठ बियाणे विभागामार्फत आदिवासी भागातील शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप कार्यक्रम संपन्न
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत बियाणे विभागाच्या आदिवासी उपयोजना (TSP) अंतर्गत प्राप्त अनुदानाचा उपयोग करून मौजे शिंगोशी, ता. कळवण, जि. नाशिक येथील आदिवासी शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांच्या विविध वाणांचे मोफत बियाणे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली व संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रभारी कुलसचिव व बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नितीन दानवले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
या कार्यक्रमात एकूण 234 शेतकऱ्यांना कमी पाण्यात जास्त उत्पादन देणाऱ्या गहू वाणांचे (अनुपम, अनुराग, नेत्रावती) व हरभऱ्याचे (विक्रम, विक्रांत) बियाणे वाटप करण्यात आले. लाभार्थी शेतकरी व पत्रकार बांधवांनी विद्यापीठाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल कुलगुरू, संशोधन संचालक व प्रमुख शास्त्रज्ञांचे आभार मानले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी बिजोत्पादन अधिकारी डॉ. के. सी. गागरे, विपणन अधिकारी डॉ. डी. एस. ठाकरे तसेच बियाणे प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमास मौजे शिंगोशी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच महिला व पुरुष शेतकरी व परिसरातील पत्रकार बांधव उपस्थित होते.