प्रणव पवार यांची कनिष्ठ अभियंता पदावर निवड

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : तालुक्यातील शिरसगाव येथील प्रगतशील शेतकरी गोकुळ पवार यांचे चिरंजीव प्रणव गोकुळ पवार यांची महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंता पदावर निवड झाली आहे. या यशाबद्दल शिरसगाव ग्रामपंचायत व गणेशराव मुदगुले मित्र मंडळाच्या वतीने विठ्ठल मंदिर शिरसगाव येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक राजाराम काकडे होते. यावेळी नितीन गवारे, दिनकरराव यादव, गणेशराव मुदगुले, राजाराम काकडे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत पवार यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. संजय गांधी निराधार योजना तालुकाध्यक्ष गणेशराव मुदगुले यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, प्रणव ऊर्फ सोना पवार यांच्या निवडीमुळे शिरसगावच्या नागरिकांना प्रेरणा मिळाली आहे. आज प्रणवचा वाढदिवस असल्याने हा क्षण अधिक महत्त्वाचा ठरतो. गावातील तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा. प्रणव यांनी शासकीय सेवेसाठी ध्येय निश्चित केले व ते साध्य केले.
प्रणव पवार यांना विजय पवार, रवी पवार, अनिल काकडे व त्यांच्या कुटुंबीयांचे मार्गदर्शन व पाठिंबा लाभला. प्रणव यांना तीन ठिकाणी नोकरीच्या संधी मिळाल्या, त्यापैकी जिल्हा परिषदेची सेवा स्वीकारली. त्यांच्या वडिलांपासून आतापर्यंतचे त्यांचे संघर्षमय जीवन कौतुकास्पद आहे. ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी दिनकरराव यादव यांनी शिरसगाव ग्रामपंचायतीमार्फत विविध स्पर्धा परीक्षांसाठी वाचनालयासारखे उपक्रम सुरू करण्याची मागणी केली. समारंभास अशोकराव पवार, साईनाथ गवारे, भाऊ गवारे, बापूराव काळे, नेहरूनाना बकाल, कडू पवार, रवी पवार, विजू पवार, अण्णासाहेब ताके आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.