अहमदनगर इपीएस पेन्शनर्स मोर्चात सहभागी व्हा- पोखरकर
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : इपीएस ९५ पेन्शनर्स यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या, दि ११ मार्च रोजी अहमदनगर भविष्य निधी कार्यालय, व जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात येणारे निदर्शने व बैठा सत्याग्रह यासाठी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी हरेगाव फाटा स्वागत मंगल कार्यालय येथे शनिवारी झालेल्या पेन्शनर्स बैठकीत केले आहे.
राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात येणार आहे. याबाबत पेन्शन धारकांना माहिती देण्यासाठी लोणी, शिर्डी, श्रीरामपूर येथे बैठका आयोजित केल्या होत्या. त्यासाठी राष्ट्रीय संघर्ष समिती प.भारत संघटक सुभाष पोखरकर, जिल्हाध्यक्ष संपत समिंदर, महराष्ट्र महिला आघाडी उपाध्यक्षा आशाताई शिंदे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष भगवंत वाळके, दशरथ पवार, राधाकृष्ण धुमाळ, रायभान तुपे आदींसह कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.
या मेळाव्यात आतापर्यंत देशभर केलेल्या संघर्षाची माहिती देऊन कमांडर अशोकराव राउत यांनी वेळोवेळी केलेल्या चर्चा व शासनाशी झालेल्या चर्चेची माहिती देऊन शासनास आमच्या मागण्या योग्य कशा आहेत ते पटवून दिले. रु ७५००/- दरमहा पेन्शन व महागाई भत्ता व दर्जेदार वैद्यकीय सुविधा द्यावी, अशा माफक मागणी असताना देखील अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाला याची जाणीव व्हावी म्हणून ११ मार्च रोजी देशभरातील सर्व भविष्य निर्वाह निधी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निदर्शने करून शासनाला निवेदन सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पेन्शनर्स यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.