शिरसगाव येथे सरला बेट ते पंढरपूर पायी दिंडीचे भव्य स्वागत

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : श्रीक्षेत्र गोदावरी धाम ते पंढरपूर पायी दिंडीच्या दुसऱ्या दिवशी, स्मार्त एकादशीनिमित्त शिरसगाव येथे वारकऱ्यांचे गावकऱ्यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. या प्रसंगी दिंडीत सहभागी सर्व वारकऱ्यांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
शिरसगाव हे सरला बेटाशी ऐतिहासिक व आध्यात्मिकदृष्ट्या जोडलेले गाव असून, येथे हरीबाबांचे मंदिर असून, तेथील अध्यात्मिक परंपरेला आजही गावकऱ्यांनी उजाळा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर गावातील नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी दिंडीचे मनोभावे स्वागत करून वारकरी परंपरेचा गौरव वाढविला.
या वेळी श्रीक्षेत्र गोदावरी धामचे महंत रामगिरी महाराज यांनी शिरसगावातील ग्रामस्थ व आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. “गावकऱ्यांनी जे प्रेम व भक्तिभावाने सेवा केली, त्याला तोड नाही,” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने पुष्पहार, श्रीफळ व शाल देऊन सन्मान करण्यात आला.
दिंडीतील वारकऱ्यांचे स्वागत गणेशराव मुदगुले, अशोकराव पवार, बाळासाहेब बकाल, दिनकरराव यादव, शांताराम गवारे, साईनाथ गवारे, रवी पवार, शंकर पूरनाळे, सुरेश मुदगुले, संजय यादव, संदीप वाघमारे, गणेश वाघ आदींनी अत्यंत उत्साहात केले. दिंडी मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.