सामाजिक

हरेगाव येथे वृद्ध मेळावा संपन्न

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगाव येथे जिल्हास्तरीय सहृदय संवाद वृद्ध मेळावा संपन्न झाला. श्रीरामपूर माणुसकीची भिंत व समाजसेवक बाबासाहेब सोनवणे यांच्या वतीने वृद्ध मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

जेष्ठ नागरिकांना समाजात महत्वाचे स्थान आहे. परंतु माणसाचा जगण्याचा वेग प्रचंड वाढल्याने वृद्धांच्या समस्यांना कोणी वाली राहिला नाही. अशा परिस्थितीत निवृत्तीनंतर जीवन व्यतित करणाऱ्या वृद्धांच्या समस्या कोण सोडवणार हे जाणून समाजसेवक बाबासाहेब सोनवणे व श्रीरामपूर माणुसकीची भिंत यांच्या विद्यमाने तालुक्यातील हरेगाव येथे ह्रदयस्पर्शी वृद्ध संवाद साधण्यात आला. या सामाजिक दायित्व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य फा. रोझारिओ होते. वृद्ध मेळाव्यासाठी जिल्ह्यातून वृद्ध संघटनेचे प्रतिनिधी व वृद्ध मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी वृद्धांनी मेळाव्याच्या व्यासपीठावर आपल्या समस्यांना वाट मोकळी करुन दिली. सेवानिवृत्तीनंतर आम्ही घरातून फक्त चांगल्या संवादाची अपेक्षा करतो. परंतु आमच्याशी संवाद साधण्यास कोणी तयार नाही. अनेक वृद्धांनी आरोग्याचा प्रश्न माडले. वृद्ध मेळाव्यात प्राचार्य फा.रोझारिओ म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांपासून वृद्धांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी स्व. सोनवणे गुरुजी प्रिन्सिपल संत तेरेजा हायस्कुल मध्ये हा वृद्ध मेळावा 16 वर्षांपूर्वी सुरु केला. त्यांचे संस्कार व वारसा समाजसेवक बाबासाहेब सोनवणे वृद्ध मेळाव्याच्या रूपाने पुढे नेत आहे. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असुन जेष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी समाजाच्या सर्वच घटकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

कार्यक्रमाचे आयोजक समाजसेवक बाबासाहेब सोनवणे म्हणाले, प्रत्येक जेष्ठ नागरिकांची सेवा करताना आपले आई वडील त्यांच्यामध्ये दिसतात. जेष्ठांच्या समस्या समजुन घेणे हाच या वृद्ध मेळाव्यामागील आयोजनाचा निस्वार्थ हेतु आहे. वृद्धांशी संवाद साधल्यामुळे समस्या समजु शकल्या. तळागाळातील एखाद्या वृद्ध आईला केलेली मदत व तिने दिलेला तोंडभरून आशीर्वादाचे दोन शब्द मोठे असतात. ती खरी सेवा, तो खरा पुरस्कार आहे.

वृद्ध व्यक्तींना सामाजिक प्रवाहात सामावून घेण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोनाची गरज आहे. समाजाला आपल्या कर्तव्याची व वृद्धांना आपल्या हक्काची जाणीव करून देणारा आजचा दिवस आहे. वृद्ध व्यक्तींची त्रुटींवर मात करून लढण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहनाची आणि विश्वासाची जोड देण्याचा आज वृद्ध मेळाव्यानिमित्त निर्धार करू या. आई व वडिलांना सन्मान देऊन त्यांची सेवा करण्याची शपथ घेऊ या, असे सांगितले. मेळाव्यात वृद्धांना आधार असणाऱ्या उत्तम काठ्या देण्यात आल्या.

यावेळी प्रमुख धर्मगुरू फा. डॉमनिक, सचिन, रिचर्ड हे धर्मगुरू तसेच माजी सरपंच सुभाष बोधक, सुभाष पंडित, डी एस गायकवाड, रमेश पठारे आदींसह वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button