राष्ट्रीय संघर्ष समिती शृंखला उपोषणास खा.सुप्रिया सुळे यांची भेट
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : इपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे दि. ७ डिसेंबर पासून नवी दिल्ली रामलीला मैदानावर देशव्यापी ऐतिहासिक मेळावा झाल्यावर केंद्र सरकारकडून निर्णय न झाल्याने जंतर मंतर येथे ८ डिसेंबर पासून शृंखला उपोषण राष्ट्रीय संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या नेतृत्वाखाली सुरु असून दि. १२ डिसेंबर रोजी खा.सुप्रिया सुळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठींबा व समर्थन दिले.
यावेळी बोलताना खा. सुळे म्हणाल्या की, मला आपल्या प्रश्नाची जाणीव आहे. महिन्याला हजार रुपये पेन्शन मिळते. त्यातून नातवाच्या वाढदिवशी एखादी छोटी भेटवस्तू देऊ शकत नाही. सरकारकडे आपल्या हक्काचा पैसा आहे. त्यातूनच आपण पेन्शन वाढ मागत आहेत. ते सरकारने दिलेच पाहिजेत. सर्वांना महागाई भत्ता लागू आहे तर इपीएसच्या सदस्यांना सुद्धा महागाई भत्त्यासह पेन्शन वाढ दिलीच पाहिजे. या व्यतिरिक्त वैद्यकीय सुविधाही उपलब्ध झाली पाहिजे.
लोकसभेत सुद्धा हा मुद्दा नुकताच मांडला आहे. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात पेन्शनचा मुद्दा समाविष्ट असेल असे जाहीर केले. हा राजनीतीचा विषय नाही. खा.हेमा मालिनी यांनीही दोन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदीची शिष्टमंडळासह भेट घेतली असेही त्या म्हणाल्या. उपोषणस्थळी खा. अमोल कोल्हे यांनीही भेट देऊन कामगार मंत्री यांचेशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. अनेक खासदारांनी हा प्रश्न मांडल्याने आपल्या लढ्याला यश मिळेल अशी ग्वाही अशोकराव राउत यांनी दिली.
यावेळी वीरेंद्रसिंह राजावत, देवीसिंग जाधव, पी एन पाटील, आंबेकर, सुभाष पोखरकर, संपत समिंदर, आशा शिंदे, नारखेडे, भगवंत वाळके आदी उपस्थित होते. अद्याप निर्णय न झाल्याने दि. १३ डिसेंबर पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.