शेतीमधील शाश्वततेसाठी जी.एम. तंत्रज्ञान महत्वाचे – कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील
महात्मा फुले कृषि विद्यापीठात जैव तंत्रज्ञानावरील कार्यशाळा संपन्न
राहुरी विद्यापीठ : कपाशीसारख्या पिकामध्ये बी.टी. जनूके परावर्तीत केल्यामुळे कपाशीच्या उत्पादनात भरीव वाढ झाली आहे. जी.एम. तंत्रज्ञान वापरुन तयार केलेल्या पिकांमुळे गेल्या 25 वर्षात मानवाला किंवा पर्यावरणाला धोका झाल्याचा शास्त्रोक्त पुरावा नाही. जी.एम. तंत्रज्ञान वापरुन तयार केलेल्या पिकांमुळे किटकनाशकांचा वापर कमी प्रमाणात होतो. त्यामुळे शेतकर्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होते. पर्यायाने शेतकर्यांना आर्थिक फायदा होतो. त्यामुळे शेतीमधील शाश्वततेसाठी जी.एम. तंत्रज्ञान फायद्याचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व नवी दिल्ली येथील बायोटेक कन्सोरशियम ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि जैवतंत्रज्ञानातील विकास, धोरणे आणि पद्धती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाावरुन कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. याप्रसंगी बायोटेक कन्सोरशियम इंडिया लिमिटेड, नवी दिल्लीचे मुख्य जनरल मॅनेजर डॉ. विभा आहुजा, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, जीवरसायनशास्त्र विभाग प्रमुख व राज्यस्तरीय जैवतंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. अनिल काळे उपस्थित होते. यावेळी पुसा, नवी दिल्ली येथील नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेसचे माजी संचालक डॉ. के.सी. बंसल व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. व्यंकटेश्वरलू हे ऑनलाईन उपस्थित होते.
डॉ. के.सी. बंसल आपल्या भाषणात म्हणाले की पिकांमध्ये जनुकीय बदल तयार करण्यात आलेल्या विविध पिकातील वाणांमुळे उत्पादनात जवळ जवळ 22 टक्क्यांपर्यंत वाढ होते, किटकनाशकांवरील खर्च 37 टक्क्यांपर्यंत कमी होतो तसेच जमिनीतील आद्रतेचे व मुलद्रव्यांचे संवर्धन होते. यामुळे जी.एम. हे तंत्रज्ञान शेतीसाठी महत्वाचा घटक असल्याचे यावेळी ते म्हणाले. डॉ. व्यंकटेश्वरलू आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की जी.एम. व जनूकीय संपादन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शासकीय व खाजगी संस्थांनी नवनविन वाण/संकर तयार करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाची भुमीका फार महत्वाची आहे. जनूकीय संपादन तंत्रज्ञान ही फक्त एक सुधारीत प्रजणन पध्दत असून यामुळे इतर पिकांवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. यावेळी डॉ. सुनिल गोरंटीवार म्हणाले की जी.एम. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर हे अतिशय फायद्याचे तंत्रज्ञान आहे. या कार्यशाळेमधून संशोधनाला योग्य दिशा मिळून चालना मिळण्याबरोबरच बुध्दीमंथन होईल.
यावेळी हैद्राबाद येथील डी.सी.एम., श्रीराम लि.च्या बायोसीडस् विभागाचे कार्यकारी संचालक डॉ. परेश वर्मा यांनी शेतीमधील शाश्वत उत्पादनासाठी जी.एम. पिके, नागपूर येथील केंद्रिय कापूस संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के.पी. राघवेंद्र यांनी कपाशी पिकातील सध्याच्या समस्या व जनुकीय तंत्रज्ञान, हैद्राबाद येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या भारतीय भात संशोधन संस्थेच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सत्येंद्र कुमार मंग्रुथीया, डॉ. विभा अहुजा यांनी कृषि जैव तंत्रज्ञानातील उदयोन्मुख प्रमाणीकरणाचे धोरणे तर महिको प्रा.लि.चे डॉ. अनुप निंबाळकर यांनी जी.एम. पिकांचे शेतीमधील प्रयोग व राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथील डॉ. किर्तीकुमार कोंढारे यांनी जनूकीय संपादनमधील संशोधन या विषयांवर मार्गदर्शन केले. या तांत्रिक कार्यशाळेचे नियमन डॉ. अशोक जाधव यांनी केले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. अनिल काळे यांनी केले.
कार्यशाळेसंबंधीची माहिती डॉ. विभा आहूजा यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ पवन कुलवाल यांनी तर आभार डॉ. विजू आमोलिक यांनी मानले. या कार्यशाळेसाठी सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, सहयोगी संशोधन संचालक, पीक विशेषज्ञ, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, प्रगतशील शेतकरी कृषिभूषण सुरसिंग पवार, डॉ. दत्तात्रय वने, सौ. स्वाती शिंगाडे तसेच विद्याथी व विद्यार्थीनी उपस्थित होते.