पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार – जिल्हाध्यक्ष भोसले
राहुरी : ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अनेकविध समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या माध्यमातून युवा ग्रामीण पत्रकार संघाचे मोठे संघटन जिल्ह्यात तयार होत असून पत्रकारांबरोबर सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याकामी सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष महेश भोसले यांनी केले आहे.
तालुक्यातील मुळा धरण येथे आयोजित राहुरी तालुका बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नाशिक विभाग अध्यक्ष शरद तांबे होते. प्रसंगी व्यासपीठावर जिल्ह्याचे प्रमुख सल्लागार प्रभंजन कनिंगध्वज, जिल्हा सचिव बाळकृष्ण भोसले, उपाध्यक्ष उमेश साठे, सहसचिव रमेश बोरूडे, निमंत्रक राजेंद्र म्हसे उपस्थित होते.
या प्रसंगी राहुरी तालुका कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. यात तालुकाध्यक्षपदी अशोक मंडलिक, सचिव रमेश जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, खजिनदार राजेंद्र साळवे, शहराध्यक्ष समीर शेख, प्रसिद्धी प्रमुख म्हणून मधुकर म्हसे व लक्ष्मण पटारे, सहसचिव कमलेश विधाते, दिपक मकासरे, जावेद शेख संघटक तर सदस्यपदी मनोज साळवे, रमेश खेमनर, अनिल तारडे, प्रमोद डफळ, युनूस शेख, सोमनाथ वाघ, वसंत भोसले, प्रशांत जोशी यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
यावेळी बोलताना प्रभंजन कनिंगध्वज म्हणाले पत्रकारीतेत नव्याने येत असलेल्या तरूणांना बातम्यांविषयीचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तालुक्या तालुक्यातून अशी प्रशिक्षण शिबीरे संघटनेच्या माध्यमातून घेतली जाणार असल्याचे ते म्हणाले. बाळकृष्ण भोसले आपल्या भाषणात म्हणाले ग्रामीण पत्रकारांच्या समस्या छोट्या जरी असल्या तरी कालांतराने त्या उग्र होत जातात. त्यांना वेळीच शासन प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी संघाची भुमिका महत्त्वाची राहणार असून सर्व सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या प्रती समर्पित भावनेने पत्रकार संघाच्या माध्यमातून भविष्यात काम केले जाणार आहे.
प्रसंगी शरद तांबे यांनी नवनिर्वचित सदस्य व पदाधिकारी यांना शुभेच्छा देताना संघटनेची उंची वाढेल अशी कामे व्हावीत असा आशावाद व्यक्त केला. रमेश बोरूडे, मधुकर म्हसे, अशोक मंडलिक, राजेंद्र साळवे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन रमेश जाधव यांनी केले. प्रसंगी बहुसंख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.