पेमगिरीत मोठ्या उत्साहात स्वराज्य संकल्प दिवस साजरा
संगमनेर | बाळासाहेब भोर : ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा लाभलेल्या पेमगिरीत आज 390 वा स्वराज्य संकल्प दिन मोठ्या मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी चाकणमधील पेमगिरी गावचे भूमिपुत्र असलेले प्रा.राजू दीक्षित यांच्याबरोबर शालेय विद्यार्थी व शिक्षक, शिवभक्त सकाळीच पेमगिरीत दाखल झाले.
शहाजी महाराज यांची प्रतिमा असलेल्या पालखी बरोबर ढोल ताशाच्या गजरात शिवकालीन पारंपारिक शस्त्र कलाही अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी मिरवणुकी दरम्यान सादर केल्या. त्यानंतर सर्व विद्यार्थी, प्रमुख पाहुणे व गावकरी शहागडावर पोहोचले व सर्वप्रथम किल्यावर भगवा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी शहाजीराजे, छत्रपती शिवराय, संभाजी महाराज यांच्या गारद देण्यात आल्या.
हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा शहाजी महाराजांनी 16 सप्टेंबर 1633 रोजी सर्वप्रथम याच शहागडावर केली. या ऐतिहासिक घटनेला आज तब्बल 390 वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिवस स्वराज्य संकल्प दिन म्हणून आज साजरा करण्यात आला. याच अनुषंगाने हा इतिहास आजच्या पिढीला समजावा यासाठी हा ऐतिहासिक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी शहागड व परिसरातील इतिहास उपस्थित समुदायासमोर विशद केला.
या कार्यक्रमासाठी चाकण येथील प्रमुख पाहुण्यांबरोबर, पेमगिरी गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, जवाहरलाल नेहरू विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, विविध संस्थांनचे पदाधिकारी, शहागड युवा प्रतिष्ठानचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.