मनाला सुद्धा वैद्यकीय उपचाराची गरज- डॉ. हमीद दाभोळकर
नगर : शरीराप्रमाणेच मन सुद्धा आजारी पडते आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो, अशावेळी इतर ठिकाणी न जाता मानसोपचार तज्ञाकडे उपचार घ्यावेत असे विचार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य डॉ. हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केले.
दि. 29, 30 जुलै रोजी स्नेहालय, अहमदनगर येथे कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी डॉ. हमीद दाभोळकर यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना पुढे सांगितले की व्यक्तीला मानसिक आजार जर झाला तर अशावेळी बाबा, बुवा, मांत्रिक, तंत्रिक यांच्याकडे जाऊन अघोरी उपाय करू नयेत, त्याला वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे रुग्ण पूर्णपणे बरे होऊन पुन्हा सामान्य जीवन जगू शकतात. अशा रुग्णांचा उपहास करण्यापेक्षा त्यांना आपुलकीची वागणूक दिली जावी.
संत आणि समाजसुधारकांचे विचार आम्ही समाजासमोर नेत आहोत. देव, धर्म याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तटस्थ भूमिका आहे. कुणाच्याही श्रद्धेला आमचा विरोध नाही परंतु देव आणि धर्माच्या नावावर व्यक्तीचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण होत असेल, अघोरी आणि अनिष्ट प्रथा परंपरा आणि त्या संदर्भातील दावा कुणी करत असेल तर याला आमचा विरोध आहे, असेही डॉ. दाभोळकर यांनी स्पष्ट केले. कार्यशाळेसाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
पहिल्या दिवशी कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष अरुण कडू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहालयाचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांचे हस्ते पाण्याने दिवा पेटवून आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. यावेळी स्नेहालयाचे विश्वस्त अँड. शाम असावा तसेच अनिसचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ. संजय लढ्ढा यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळा देताना अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि स्नेहालय संस्था हे आपापल्या पातळीवर सामाजिक कार्य करत आहेत. त्यामुळे ते एकमेकांना पूरक असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात अरुण कडू पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची गरज व भूमिका स्पष्ट करून या सामाजिक कार्यात जोडून घेतल्याबद्दल उपस्थितांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर अनाप यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शैलजा अनाप यांनी केले.
या प्रशिक्षण शिबिरास राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. हमीद दाभोळकर, प्रशांत पोतदार सातारा, नंदिनी जाधव पुणे, हेमंत धानोरकर अंबाजोगाई, रमेश माने लातूर यांनी मार्गदर्शन केले.
शिबिर कशासाठी, संघटनात्मक रचना, चमत्कार सादरीकरण व जादूटोणाविरोधी कायदा याविषयी प्रशांत पोतदार यांनी मार्गदर्शन केले. वैज्ञानिक दृष्टिकोन, चमत्कारामागील विज्ञान, फल ज्योतिष थोतांड आणि खगोलशास्त्र याविषयी हेमंत धानोरकर यांनी मार्गदर्शन केले. लिंगभेद, स्रीया आणि अंधश्रद्धा या विषयावर नंदिनी जाधव यांनी संवाद साधला. बुवाबाजीची वैचारिक भूमिका, संत आणि समाज सुधारकांचे अंधश्रद्धा निर्मूलन विषयक योगदान याविषयी प्रा. रमेश माने यांनी विचार मांडले.
स्नेहालयचे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी, विश्वस्त श्याम असावा यांनी दोन्ही दिवस उपस्थित प्रशिक्षणार्थींना उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी जिल्हाध्यक्ष अरुण कडू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मधुकर अनाप, डॉ.संजय लड्डा, दादासाहेब पवार, महेश धनवटे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी अनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते गणेश चिंचोले यांनी स्नेहालय व नगर जिल्ह्यासाठी पुस्तक रूपाने भरघोस देणगी दिली. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी जिल्हाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी जादूटोणाविरोधी कायदा आपण समजून घेऊन समाजात त्याचा प्रचार आणि प्रसार करावा असे आवाहन केले.