ठळक बातम्या
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा – पिपल्स रिपाईचे पंतप्रधानांना निवेदन
चिंचोली/ बाळकृष्ण भोसले : गेल्या दोन वर्षापासून कोविड आजाराने त्रस्त झाल्याने व नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला असून गत दोन वर्षापासून शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला आहे. शेतीमाल व भाजीपाला यांना भाव नसल्याने शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहेे. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी शेतकऱ्यांची अडचण समजून घेऊन शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करावा अशी मागणी प्रा. जोगेंद्र कवाडे प्रणित पीपल्स रिपब्लिकन पक्षाने निवेदनाद्वारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की मागील दोन वर्षापासून शेतकऱ्यांचे रब्बी व खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यांचे पीक कर्ज सुद्धा फिटले नाही. चालू वर्षात तर अतिवृष्टीने शेतामध्ये उभे असणारे बाजरी, तूर, सोयाबीन, भुईमूग, कापूस, मुग, कांदा अशी महत्वाची सर्व पिके पाण्यामध्ये सडून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी सुद्धा गोड होणार नाही म्हणून शेतकऱ्यांची अडचण समजून घेत शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष किशोर भाऊ वाघमारे, जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष अतुल भिंगारदिवे, शहराध्यक्ष महेश भोसले, जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख गौतम भिंगारदिवे, संगमनेर तालुकाध्यक्ष जालिंदर आनंदा बोरुडे, महिला आघाडी प्रमुख अनिताताई वाघमारे आदी पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.