शेतकर्यांना मिळणार त्यांच्याच जिल्ह्यात फुले समर्थ कांदा बियाणे
फुले संगम सोयाबीन बियाणे २२ जुन पासून उपलब्ध
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या कांद्याच्या फुले समर्थ या वाणाला शेतकर्यांकडून दरवर्षी मोठी मागणी असते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विद्यापीठातील बियाणे विक्री केंद्रावर आणि मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक असलेल्या नाशिक, अहमदनगर व सातारा जिल्ह्यातील कृषि विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांवर फुले समर्थ या वाणाचे कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध केले आहे.
तसेच कृषि संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक, कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक, कृषि संशोधन केंद्र, चास, जि. अहमदनगर व कृषि संशोधन केंद्र, बोरगांव, जि. सातारा या ठिकाणी सुध्दा फुले समर्थ या वाणाची विक्री सुरु करण्यात आलेली आहे. यामुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या जिल्ह्यामध्येच सदरचे कांदा बियाणे उपलब्ध होणार आहे.
त्याचप्रमाणे विद्यापीठाने संशोधन केलेल्या सोयाबीनच्या विविध वाणांना सुध्दा शेतकर्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्या दृष्टीने विद्यापीठाने फुले संगम (केडीएस 726) या वाणाचे प्रमाणीत बियाणे दि. 22 जून, 2023 पासून विद्यापीठात विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. त्याचा सर्व शेतकर्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख शास्त्रज्ञ, बियाणे महात्मा फुले कृषि विद्यापीठ यांनी कळविले आहे.