कृषि महाविद्यालय, हाळगावचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगावचा सन 2022-23 चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे होते. यावेळी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे, शारीरिक शिक्षण निर्देशक डॉ. राहुल विधाते, प्रा. अर्चना महाजन, विद्यार्थी परिषदेचे चेअरमन अश्रफअली शेख, संयोजक संचिता नवले, ओंकार दौंड, आश्लेषा डमरे, प्रजाली गोसावी, अक्षता जमादार उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. ससाणे म्हणाले की जीवन एक स्पर्धा आहे, जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत हार मानू नये, नव्या उमेदीने काम करावे आणि सांघिक भावना जपून यश प्राप्त करावे असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी परिषदेचे चेअरमन अश्रफअली शेख यांनी विद्यार्थी परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा अहवाल उपस्थितांसमोर सादर केला.
दरम्यान, वैयक्तिक व सांघिक स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या 60 विध्यार्थांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयात पार पडलेल्या उमंग 2023 कला व क्रीडा कार्यक्रमाअंतर्गत चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व, निबंध, वादविवाद, बुद्धिबळ, कबड्डी, क्रिकेट अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर पार पडलेल्या स्पर्धांचा आढावा आकर्षक चित्रफितीमार्फत उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना समारंभात दाखवण्यात आला.
याप्रसंगी डॉ. अनारसे यांनी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये हिरीरीने घेतलेल्या सहभागाबद्द्ल कौतुक केले. क्रीडा स्पर्धाच्या आयोजनामध्ये डॉ. राहुल विधाते यांचा मोलाचा वाटा होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सखेचंद अनारसे यांनी केले. विद्यार्थ्यांना मिळालेल्या पारितोषिकांची घोषणा महाविद्यालयाच्या प्रा. अर्चना महाजन यांनी केली. तर सूत्रसंचालन कु.प्रजाली गोसावी, कु.मानसी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.संचिता नवले यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.