गुन्हे वार्ता
धानोरे भागात वीज पंपाच्या केबल चोरी; शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत आर्थिक भुर्दंड
राहुरी प्रतिनिधी : धानोरे येथील प्रवरा नदी पात्रातील धानोरे गावापासून ते वसंत बंधारा चणेगाव शिवापर्यंतच्या शेतकऱ्यांच्या नदी पात्रातील जवळपास १०० विहीरीतील वीज पंपाच्या केबल अज्ञात चोरट्यांनी चोरल्याचा प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे.
धानोरे परिसरातील शेतकऱ्यांचे या चोरीमुळे ऐन दिवाळीत प्रत्येकी सुमारे तीन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती माजी उपसरपंच जयराम भगवान दिघे, बबनराव आप्पासाहेब दिघे, सचिन विठ्ठल दिघे, भिमराज दाजीबा दिघे यांनी दिली. कोरोना तसेच नैसर्गिक आपत्तीतुन सावरत असतानाच आता शेतकऱ्यांची वीज पंपाच्या केबल चोरी गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राहुरी तालुक्यातील धानोरे ग्रामपंचायत हद्दीतील गावापासून ते संगमनेर तालुका शिवापर्यंतच्या प्रवरा नदी पात्रात शेतकऱ्यांचे वीज पंप बसवण्यात आले आहेत. अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास वीज पंपाच्या केबलची चोरी केली. आठ दिवसांपूर्वी अशाच प्रकारे अज्ञात चोरट्यांनी संगमनेर येथील चणेगाव शिवारात केबलची चोरी केली होती. राहुरी तालुक्यातील धानोरे येथील शेतकऱ्यांच्या केबलची चोरी झाल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत मोठा भुर्दंड बसला आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी पोलिस ठाणे, राहुरी यांना दुरध्वनी द्वारे घडलेल्या चोरीची माहिती दिली आहे. मात्र अद्याप या चोरी बाबत गुन्हा दाखल करण्यास शेतकरी पुढे आलेला नाही. शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या चोरीचा तपास करावा अशी मागणी येथील शेतकर्यांनी केली आहे.