राहुरी येथे वर्षश्राद्धानिमित्त डॉक्टरांचे व्याख्यान ठेवून प्रेरणादायी उपक्रम
राहुरी – शुक्रवार, दि.२१ एप्रिल २०२३ रोजी राहुरी येथे कै. कॉम्रेड ॲड.सिताराम लांबे यांच्या प्रथम वर्षाश्रद्धा निमित्त लांबे कुटुंबियांच्या वतीने समाजाला दिशादर्शक असा डॉ.ओंकार जोशी व डॉ.संजय खेडेकर यांचा आरोग्य विषयक मार्गदर्शन व्याख्यान ठेवून कै. कॉम्रेड ॲड.सिताराम लांबे पाटील यांच्या विचारांचा जागर करून श्रद्धांजली वाहिली.
डॉ.ओंकार जोशी यांनी ‘माणसाचा स्वभाव गुण व नकळत मनाच्या कृती’ या विषयावर तर डॉ.संजय खेडेकर यांनी ‘आपले धकाधकीचे जीवन आपला आहार व आपले हृदय’ या विषयावर मार्गदर्शन केले. वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला बहुतांशी कीर्तनाचा किंवा प्रवचनाचा कार्यक्रम ठेवून समाज प्रबोधन केले जाते. कार्यक्रमाला आलेले लोक देखील त्या व्यक्तीच्या किंवा त्या कुटुंबाच्या प्रेमापाई कार्यक्रमाला वेळ देखील देतात.
परंतु कै. कॉम्रेड ॲड. लांबे पाटील यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य जगताना आपल्या कृतीतून समाजाचे हित पाहून कार्य केले. त्यांच्याच विचारांचा एक भाग म्हणून कै. कॉम्रेड ॲड.लांबे पाटील यांच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला नामांकित डॉक्टरांचा व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवून लांबे कुटुंबियांनी कै. कॉम्रेड ॲड. लांबे यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमा दरम्यान कै. ॲड. सिताराम लांबे यांच्या स्मरणार्थ गुहा येथील कान्होबा उर्फ कानिफनाथ महाराज ट्रस्टला मंदिर जीर्णोद्धारासाठी व राहुरी कारखाना येथील गोशाळेला चाऱ्यासाठी निधी देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सामाजिक, राजकीय, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पत्रकार असे सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून लांबे पाटील कुटुंबियांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले तर आभार देवेंद्र लांबे पाटील यांनी मानले.