महाराष्ट्र

११ मे “महात्मा दिन” देशभरात साजरा करावा- महाराष्ट्र भूषण सचिन भाऊसाहेब गुलदगड

श्री संत सावता माळी युवक संघाचे आवाहन

नगर- महात्मा जोतिराव फुले यांना महाराष्ट्रातील दुसरे समाज सुधारक रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे व रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने ११ मे १८८८ रोजी “महात्मा” ही पदवी प्रदान केली. त्या वेळे पासून देश त्यांना महात्मा म्हणून ओळखू लागला. आता हा दिवस राज्य सरकारने “महात्मा दिन” या नावाने साजरा करण्याची मागणी श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

महात्मा फुले यांचे कार्य जगाला सर्वश्रुतच आहे. स्त्री-शुद्र-अतीशुद्र समाजाच्या उन्नतीसाठी सावित्रीबाई फुले व जोतीबा फुले ज्या तन्मयतेने झटत होते, त्यासाठी त्यांनी जे कष्ट उपसले होते, त्यामोबदल्यात महाराष्ट्रातील विशेषतः पुण्यातील ब्राम्हणशाहीने त्यांचा अतोनात छळ व अपमान केला होता. त्यामुळे सत्यशोधक कार्यकर्त्यांमध्ये व बहुजनांमध्ये त्यांचा आदर दुनावला होता.

मांडवीच्या रघुनाथ सभागृहात आपल्या उद्धारकर्त्या महामानवाचे ऋण फेडण्यासाठी गरीब व कष्टकरी जनतेने मोठ्या संख्येने आणि उत्स्फुर्तपणे जमून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विडा उचलला होता. मुंबईकर सत्यशोधक कार्यकर्ते व नारायण मेघाजी लोखंडे यांच्या आमंत्रणावरुन जोतीबा फुले मुंबईला आले होते, तेव्हा मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेच्या वतीने ११ मे १८८८ रोजी जोतीबा फुलेंना युगप्रवर्तक कार्याबद्दल “महात्मा” पदवीने गौरविण्यात आले. त्यादिवसापासुन आपणा सर्वांना जोतीबा फुले “महात्मा फुले” नावाने परिचित झाले.

११ मे २०२३ रोजी त्या घटनेस १३५ वर्षे पुर्ण होत आहेत. या घटनेचा वेध घेऊन श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेने देशभर सलग ८ वर्ष विविध उपक्रम घेऊन हा विशेष दिन साजरा केला. तसेच या दिवसास “महात्मा दिन” असे नाव दिले.

महात्मा फुले नावाने प्रसिद्ध व परिचित असलेले जोतीराव ऊर्फ जोतीबा गोविंदराव फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना ११ मे इ.स.१८८८ या साली मिळाली, त्यामुळेच ११ मे या दिवसाला महत्व प्राप्त झाले असुन ११ मे रोजी “महात्मा दिन” म्हणुन साजरा करण्यात यावा, असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी श्री संत सावता माळी युवक संघाच्या पदाधिकार्यांना व समस्त फुले प्रेमींना केले आहे.

‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक ठरले. आजही त्यांची ही ग्रंथसंपदा समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी ठरते आहे. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे.

त्यांच्या कार्याला सलामी देण्यासाठी आता नागरिकांनी पुढे येऊन त्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करणे गरजेचे आहे. त्यासाठी आगामी ११ मे रोजी या मागणीसाठी राज्य शासनाबरोबरच जिल्हा, तालुका प्रशासनाला निवेदने देऊन सरकारला हा महात्मा दिन साजरा करण्यासाठी दबाव तयार करावा लागेल. त्यांच्या कार्याला ती आदरांजली ठरेल असेही गुलदगड यांनी शेवटी म्हटले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button