दिव्यांगांसाठी विशेष घरकुल योजना व समस्यांची सोडवणूक करणार – डॉ सुधीर तांबे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : दिव्यांगाकरिता विशेष घरकुल योजना राबविण्यासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल त्याचबरोबर आ. सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून विधिमंडळात याबाबत समस्या मांडण्यात येतील असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर, अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर, आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र आणि महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन शाखा श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सहर्षा हाॅल बोंबले पाटील नगर याठिकाणी दिव्यांगाकरिता मोफत आयुर्वेद तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी डॉ सुधीर तांबे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रशांत कदम हे होते.
पुढे बोलताना डॉ सुधीर तांबे म्हणाले की, दिव्यांग व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या आहेत. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त दिव्यांगांच्या सेवेसाठी व त्यांच्या जीवनात सर्वांगीण दुरदृष्टीकोणातील सामाजिक प्रकाश टाकून सामाजिकदृष्ट्या जीवनमान उंचावण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले. ही नक्कीच पुण्यकर्माची दैवी पावती संयोजकांस मिळाली आहे. त्याचबरोबर शिबीरामध्ये मूकबधिर प्रवर्गातील उमेदवारांचा विवाह जमविण्यात यश प्राप्त झाले, हा नक्कीच दुग्धशर्करा योग आहे. दिव्यांग व्यक्तींना संजय गांधी निराधार योजना मानधन वेळेवर मिळत नाही, अंत्योदय योजनेचा लाभ मिळत नाही, आरक्षित 5% निधी वेळेत पूर्णपणे मिळत नाही हे नक्कीच शासनाच्या संवेदना बोथट झाल्याचे प्रतीक आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन अध्यक्ष डॉ.सतिष भट्टड, आशादिप केंद्र राहुरीचे डॉ.अनिल दुबे, सतिष कुंकलोळ, दुर्वांकुरचे देविदास बोंबले, स्वामींनी फुडचे संचालक तुकाराम लबडे, अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड, चेअरमन संजय साळवे, आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिव्यांग व्यक्तींची आरोग्य शिबीराच्या माध्यमातून आयोजकामुळे सेवा करण्याची संधी मिळाली हे मी माझे परमभाग्य समजतो असे प्रतिपादन अध्यक्षस्थाना वरून डॉ. प्रशांत कदम यांनी केले. याप्रसंगी डॉ. सतिष भट्टड यांनी आरोग्य व आयुर्वेद या विषयावर मार्गदर्शन केले. शिबिरात डॉ. विजय कबाडी, डॉ.आनंद सोनवणे, डॉ. अमित मकवाना, डॉ.नेहा मकवाना, डॉ.स्वप्नील नवले, डॉ. सौ.प्रज्ञा गाडेकर, डॉ. महेन्द्र बोरुडे, डॉ. विराज कदम, डॉ.दिप्ती गुप्ता, डॉ.निशांत इंगळे, डॉ. सोनाली विलायते, डॉ.अमित विलायते व प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि पंचकर्म चिकित्सा तज्ञ कर्मचारी यांनी तीनशेहून अधिक दिव्यांग व्यक्तींची आरोग्य तपासणी व उपचार करून औषधोपचार देण्यात आले.
शिबिरामध्ये कु.सोनाली साळवे रा. खडांबा ता.राहुरी (मूकबधिर) व प्रविण शेळके गोंधवणी श्रीरामपूर (मूकबधिर) यांचा विवाह अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांनी जमविला. लवकरच संस्थेच्या वतीने विवाह करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक संजय साळवे यांनी केले तर सुत्रसंचालन मुश्ताकभाई तांबोळी यांनी केले. आभार वर्षा गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमासाठी सौ. साधना चुडिवाल, नवनाथ कर्डिले, चंद्रकांत त्रिभुवन, सौ.विमल जाधव, विश्वास काळे, सुधाकर बागुल, दिलीप सदाशिव, सोमवंशी, मोमीन शेख, सविता मैड, राजेंद्र राहिंज यांनी विशेष परिश्रम घेतले.