कृषी
तंत्रज्ञान प्रसारासाठी शेतकरी प्रथम प्रकल्प उपयुक्त – संचालक विस्तार शिक्षण डॉ. तानाजी नरुटे
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ हे आपल्या तालुक्यात आहे. या विद्यापीठाने विकसीत केलेल्या तंत्रज्ञानाचा शेतकर्यांनी अवलंब करावा व आपले उत्पादन वाढवावे. बदलत्या जीवनशैलीमुळे आपण विविध रोगांना बळी पडत आहोत. आपल्या आहारात पौष्टिक तृणधान्याचा समावेश केला तर आपण सुदृढ आणि निरोगी राहु. शेती ही निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबुन आहे. पशुधनाचे उत्पादन हे आपल्या व्यवस्थापनावर अवलंबुन आहे व ते शाश्वत आहे म्हणुन पशुधन हे पुरक व्यवसाय नसुन हा मुख्य व्यवसाय म्हणुन शेतकर्यांनी करावा. पशुधन हे शेतकर्यांचे खरे धन असून तंत्रज्ञान प्रसारासाठी शेतकरी प्रथम प्रकल्प उपयुक्त असल्याचे प्रतिपादन कृषि विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. तानाजी नरुटे यांनी केले.
महात्मा फले कृषि विद्यापीठाच्या भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत शेतकरी प्रथम कार्यक्रमाच्या प्रक्षेत्र भेट आणि शेतकर्यांशी सुसंवाद कानडगाव येथे आयोजीत या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. नरुटे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाकृअप-शेतकरी प्रथम कार्यक्रमाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. दत्तात्रय पाचारणे, सहसमन्वयक डॉ. सचिन सदाफळ, डॉ. रविंद्र निमसे, प्रगतशील शेतकरी लक्ष्मण गागरे, ताराचंद गागरे, लोंढे महाराज उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. पंडित खर्डे यांनी केले. याप्रसंगी लक्ष्मण गागरे, ताराचंद गागरे, लोंढे महाराज, प्रविण गाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेतकर्यांना मफुकृवि दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. प्रक्षेत्र भेटीवेळी चिंचविहिरे गावातील श्री स्वामी समर्थ महिला बचत गटाची डाळमिल, सौ. सविता नालकर यांचे एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल, मच्छिंद्र शेटे यांच्या डाळिंब प्रक्षेत्रास भेट दिली. तसेच कणगर येथील शेतकरी प्रविण गाडे यांच्या एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल, कानडगाव येथील हौशीराम गागरे यांच्या प्रक्षेत्रास, मंजाबापु सिनारे यांच्या शेळीपालन प्रकल्पास, अर्जुन गागरे यांच्या गांडूळखत प्रकल्पास व लक्ष्मण गागरे यांच्या हरभरा बिजोत्पादन प्रक्षेत्रास मान्यवरांनी भेटी दिल्या. भेटीदरम्यान तज्ञांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास चिंचविहिरे, कणगर, कानडगाव व तांभेरे येथील शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन सदाफळ यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय शेडगे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल कोर्हाळे, डॉ. प्रविण खैरे यांनी परिश्रम घेतले.