अहिल्यानगर
आहार, विहार, विचार व वेळ हेच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली -अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण
राहुरी विद्यापीठ : शिवाजी महाराजांनी प्रत्येक लढाईच्या प्रसंगी सैनिकांच्या आहाराचे केलेले नियोजन तसेच वेळेचे नियोजन व यासाठी सकारात्मक विचारांची दिलेली जोड यामुळे प्रत्येक लढाईत यश मिळविले. शिवाजी महाराजांच्या या गुणांचा उपयोग सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आचरणात केला तर त्यांचे जीवन यशस्वी होईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती पदव्युत्तर कृषी महाविद्यालय, अभियांत्रिकी कृषी महाविद्यालय व हाळगाव कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण बोलत होते. याप्रसंगी पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बापूसाहेब भाकरे, हळगाव कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाने, कुलसचिव प्रमोद लहाळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. महावीरसिंग चव्हाण, पदव्युत्तर महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.ढाकरे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अतुल अत्रे, विद्यापीठाचे नियंत्रक वि.टी. पाटील उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात डॉ. उत्तम चव्हाण पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी नियोजन, आचरण, शिस्तबद्धता, धाडसीपणा, दुसऱ्यावरील विश्वास या शिवाजी महाराजांच्या महत्त्वाच्या गुणांचे नेहमी आचरण करावे. त्या गुणांचा उपयोग आपल्या जीवनात कसा होईल ते पहावे. सर्वांनी व्यसनमुक्त राहून आपल्या विद्वत्तेने आपले व देशाचे भविष्य उज्वल करावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. डॉ. महावीरसिंग चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिवाजी महाराजांच्या पोवाड्यातील काही भाग प्रस्तुत केला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनातून या शिवजयंती कार्यक्रमासाठी बाहेरच्या वक्त्याला न बोलविता येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच शिवजयंती निमित्तच्या या कार्यक्रमात शिवाजी महाराजांबद्दल वेगवेगळे विचार मांडावेत असे आवाहन केले होते. त्यानुसार पदव्युत्तर महाविद्यालय तसेच कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, हळगाव कृषी महाविद्यालय अशा या तीन महाविद्यालयातील अंगद लाटे, समीक्षा वाघ, प्रसाद उबाळे, प्रमिला खोतकर, अभिषेक पाटील, सौरभ रामटेके व सोनाली घोगरे या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांच्या भाषणातून मांडले. अन्नपूर्णा होळकर व स्नेहल कदम या विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांवरील पोवाडा याप्रसंगी सादर केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महावीरसिंग चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार निशांत भालेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी तसेच पदव्युत्तर महाविद्यालयाचे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे व हळगाव कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.