अहिल्यानगर

श्रीमान योगी वाचन सोहळ्याच्या समारोपाने उंदीरगाव येथे शिवजयंती साजरी

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : ३९३ व्या शिवजयंती निमित्त आयोजित श्रीमान योगी वाचन सोहळ्याच्या समारोप प्रसंगी गावातील मंदिरात दिपोत्सव, महारुद्र हनुमान आरती व छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती करण्यात आली.
ग्रामदैवताच्या मंदिरातील सर्व देवाच्या मूर्तिना हार घालण्यात आले. गावातील मुलींनी मंदिरासमोर रांगोळी काढली. तरुणांनी सर्व मंदिर परिसरात दिवे लावले. सायंकाळी शिवाजी महाराजांच्या मूर्तीची व श्रीमानयोगी पुस्तकांची पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. कुठलेही बीभत्स साऊंड सिस्टम न लावता फक्त घोषणा देत मिरवणूक हनुमान मंदिरापर्यंत नेण्यात आली. हनुमान मंदिरात सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ११ दिवस जे वाचनाला बसले होते, अशा सर्व वाचकांच्या हस्ते महारुद्र हनुमान व छत्रपती शिवरायांची आरती करण्यात आली व उपस्थित ग्रामस्थांना प्रसाद देण्यात आला.
गौरी नाईक, समृद्धी नाईक, पूजा नाईक यांनी शिवजयंती निमित्त किल्ला बनवला होता. तो किल्ला देखील मंदिरात ठेवण्यात आला. वाचकांच्या वतीने त्यांचे किल्ला बनविल्याबद्दल आभार मानले. वाचन सोहळा संपल्यावर सर्व वाचक भावुक झाले. शेवटी अजित नाईक, अजिंक्य गलांडे, नितीन निपुंगे, अजिंक्य गायके, सतीश नाईक यांनी अनुभव व मनोगत व्यक्त केले.

Related Articles

Back to top button