अहिल्यानगर
राहुरी खुर्द ग्रामपंचायतीने गोटूंबे आखाडा गावात तंटामुक्ती समिती स्थापन करावी- जिल्हा उपाध्यक्ष रमेश खेमनर
राहुरी
: गावाच्या हितासाठी लवकरात लवकर ग्रामसभा घेऊन राजकीय मतभेद बाजूला ठेवून निःपक्षपणाने राहुरी तालुक्यातील गोटूंबे आखाडा गावात तंटामुक्ती समिती स्थापन करण्याची मागणी युवा शक्ती ग्रामविकास संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश खेमनर यांनी केली आहे.पुढे बोलताना रमेश खेमनर म्हणाले की, राहुरी खुर्द ग्रामपंचायतीची निवडणुक होऊन दोन वर्षाचा कालावधी उलटूनही राहुरी खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत असलेले गोटूंबे आखाडा गावात अजूनपर्यंत तंटामुक्ती समिती स्थापन करण्यात आलेली नसून शासन निर्णयानुसार 26 जानेवारी 2023 रोजी गोटूंबे आखाडा येथे ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेत गोटूंबे आखाडा गावात तंटामुक्ती स्थापन करण्यात यावी याबाबत 23 जानेवारी रोजी ग्रामपंचायतीला लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. तसेच राहुरी पंचायत समिती कार्यालयाकडून आचारसंहितामुळे ग्रामसभा घेण्यास हरकत नसल्याचे कळविले होते.
तरीही राहुरी खुर्द ग्रामपंचायतीने 26 जानेवारी रोजी ग्रामसभा घेण्याचे टाळले. राहुरी खुर्द ग्रामपंचायतीने गोटूंबे आखाडा गावात इतर सर्व समित्या स्थापन केल्या आहेत. परंतु 2 वर्षात तंटामुक्ती समिती का स्थापन केली नाही ? हे प्रश्नचिन्ह असून गोटूंबे आखाडा गावात मागील इतिहास पाहता व शासन नियमावली पाहता ग्रामपंचायतीद्वारे ग्रामसभा घेण्यास टाळाटाळ केली जात असून मागील 15 ऑगस्ट 2022 रोजीही ग्रामसभा गोटूंबे आखाडा गावात घेण्याची मागणी केल्यानंतर 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभा झाली. परंतु त्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी अनेक समस्या व प्रश्नांचा भडिमार करूनही ग्रामस्थांनी मांडलेल्या ठरावावर आत्तापर्यंत कोणतीच कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमधून रोष निर्माण होत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे आत्तापर्यंत गोटूंबे आखाडा गावात मागील 5 वर्षात किती ग्रामसभा झाल्या व तंटामुक्ती समिती का स्थापन करण्यात आली नाही याबाबत माहिती घेणार असून दोषींवर योग्य कार्यवाही करावी व तसेच गावातील वाढत्या घटना, अवैध धंदे अथवा जिल्हा परिषद शाळेत सुट्टीच्या दिवशी चालणारे पत्याचे डाव तसेच स्मशान भूमीतील विद्युत एल. ई. डी. पथदिव्यांची झालेली साहित्याची चोरी व गावातील इतर होणाऱ्या चोऱ्या याबाबत कडक पाऊल उचलण्यासाठी व गावातील तंटे मिटवण्यासाठी तंटामुक्ती समिती गोटूंबे आखाडा येथे स्थापन करणे गरजेचे आहे, असे रमेश खेमनर यांनी सांगितले आहे.