अहमदनगर
डॉ. चारुदत्त मायी आणि पद्मश्री पोपटराव पवार यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानीत करण्यात येणार
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा 36 वा पदवीदान समारंभ
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचा 36 वा पदवीदान समारंभ शुक्रवार दि. 06 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 11.00 वा. आयोजीत करण्यात आला आहे. कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयासमोरील मंडपामध्ये ऑफलाईन व ऑनलाईन पध्दतीने होणार्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल व महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी असणार आहेत.
यावेळी महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा कृषि मंत्री ना. अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार असून ते दीक्षान्त भाषण करणार आहेत. यावेळी या समारंभासाठी विद्यापीठाचे विद्यापीठ कार्यकारी आणि विद्यापरिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. यावेळी नवी दिल्ली येथील कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष मा.डॉ. चारुदत्त मायी आणि महाराष्ट्र राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांना कृषि क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देवून सन्मानीत करण्यात येणार आहे अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी दिली.
पदवीदान समारंभात गेल्या वर्षातील विविध विद्याशाखांतील एकुण 6 हजार 832 स्नातकांना पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीने कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्याद्वारे अनुग्रहित करण्यात येणार आहेत. त्यात विविध विद्याशाखातील 6 हजार 388 स्नातकांना पदवी, 382 स्नातकांना पदव्युत्तर पदवी तर 62 स्नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहित केले जाईल. यावेळी यशस्वी स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदके आणि रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या समारंभात केवळ पारितोषिके प्राप्त स्नातक व आचार्य पदवी स्नातक यांनाच प्रत्यक्ष मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. अन्य स्नातकांना संबंधित महाविद्यालयात ऑनलाईन पध्दतीने अनुग्रहित करण्यात येणार आहे. पदवीदान समारंभाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या यु-ट्युब चॅनेल तसेच झुम लिंकवरुन केले जाणार आहे.