अहिल्यानगर
खा.सदाशिव लोखंडे यांचे हात बळकट करण्याचे काम मतदार संघातील नागरिक निश्चित करणार – देवेंद्र लांबे पाटील
खासदार सदाशिव लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरीत विविध उपक्रम
राहुरी – खासदार सदाशिव लोखंडे यांच्या वाढदिवसा निमित संत गाडगेबाबा आश्रम शाळा येथे विद्यार्थ्यांना फळ वाटून व टाकाळीमिया येथे लाईफ ईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्व रोग निदान मोफत शिबीर राबविण्यात आले.
या कार्यक्रमास उपजिल्हाप्रमुख जयवंत पवार, तालुका संघटक अशोक तनपुरे, शहर प्रमुख गंगाधर सांगळे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन बाळासाहेबांची शिवसेना राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच तथा शेतकरी आघाडी ता. प्रमुख किशोर मोरे हे होते. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे बोलताना म्हणाले कि, खा. सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून राहुरी मतदार संघात नुकतेच ७.५ कोटीचा भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. राहुरी तालुक्याच्या दळणवळणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असणाऱ्या तीन रस्त्यांना खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रयत्नांमुळे अखेर मंजुरी मिळालेली आहे.
खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रयत्नाने राहुरी तालुक्यातील ३२ गावांचा दळण वळणासाठी महत्वाचे रस्ते मंजूर करण्यात आलेले आहेत. नागरिकांमधून या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी अशी मागणी अनेक वेळा केली गेली होती. पदाधिकाऱ्यांनी याबाबत खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरवा केला. खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश करत सदर रस्त्यांचे कामे त्वरित सुरू करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या, त्यानुसार तालुक्यातील सोनगाव, सात्रळ, रामपूर, कोल्हार खु., चिंचोली, गंगापूर, दवणगाव, आंबी, अंमळनेर व चांदेगाव रस्ता प्रजिमा १५७ मजबुतीकरण डांबरीकरण करणे रू.१ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. तसेच संगमनेर- शिपलापूर- गुहा- देवळाली- टाकळीमिया- पाथरे- तीळापुर प्रजीमा २६ मजबुतीकरण डांबरीकरण करणे करिता रू. ३.५ कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सोनगाव सात्रळ कोल्हार चिंचोली आंबी अमळनेर चांदेगाव या रस्त्यासाठी देखील तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीचे हात बळकट करण्याचे काम मतदारसंघातील नागरिक निश्चित करणार आहेत असे देवेंद्र लांबे म्हणाले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना टाकळीमिया गावचे उपसरपंच तथा बाळासाहेबांची शिवसेनेचे शेतकरी आघाडी तालुका प्रमुख किशोर मोरे म्हणाले की, टाकळीमिया ग्रामपंचायत हद्दीतील रखडलेले शिवरस्ते खा. सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी खा.लोखंडे यांच्या माध्यमातून शिवसेना शेतकरी आघाडी शेतकऱ्यांसोबत उभी आहे असे श्री. मोरे म्हणाले. या प्रसंगी सुभाष जंदरे, सचिन मेहेत्रे, भागवत करपे, रामचंद्र करपे, गिरीश निमसे, रामचंद्र करपे, विष्णू कवाने, सुनिल कुलकर्णी, संजय भुजबळ, संजय पाचरणे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.