अहमदनगर

विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांची शिकवण आचरणात आणावी – अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण

राहुरी विद्यापीठ : सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिका. मुलींना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी आपले सर्व आयुष्य व्यतीत केले. हाल-अपेष्टा सहन केल्या. त्यामुळे स्त्रियांना समाजामध्ये आज बरोबरीची वागणूक मिळत आहे. मुलांवर चांगले संस्कार करण्याचे महत्वाचे कार्य आईला करावे लागते व त्यामुळेच पुढची पिढी संस्कारक्षम निर्माण होते असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. चव्हाण अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी.के. ससाणे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आज आपल्या देशामध्ये महिला सर्व क्षेत्रांमध्ये काम करत आहेत. देशाच्या संरक्षण विभागात सुद्धा महिला अत्यंत प्रभावीपणे काम करत आहेत. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी जे काम केले त्यांची शिकवण महाविद्यालयीन मुला-मुलींनी आपल्या आचरणात आणावी.
यावेळी महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाचे मानसी पाटील, चंद्रशेखर वाळे व स्नेहल कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे यांनी केले तर आभार डॉ. चारुदत्त चौधरी यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. मनोज गुड, डॉ. प्रेरणा भोसले व प्रा. कीर्ती भांगरे व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button