अहिल्यानगर
जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांजकडून निसारभाई सय्यद यांना सन्मानपत्र प्रदान
राहुरी : तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक भडकत्या ज्वालाचे संपादक निसारभाई सय्यद यांना जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र राज्य, ठाणे यांच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपनकार व सचिव संचिता भंडारी यांनी हे सन्मानपत्र प्रदान केले.
राहुरी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद हे गेल्या ४० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून त्यांनी आत्तापर्यंत सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आदी विविध क्षेत्रासंबंधी आपल्या लेखणीतून आवाज उठविलेला आहे. निर्भीड व निःपक्ष पत्रकार म्हणून त्यांची राहुरी तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात ओळख आहे. पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहून पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.
आजच्या संगणक युगात महागाईची झळ सोसूनही स्वखर्चाने ग्रामीण भागात साप्ताहिकाच्या माध्यमातून समाज जागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार निसारभाई सय्यद यांनी केल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेत जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मानपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले. त्यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.