गुन्हे वार्ता
कोल्हार खुर्द शिवारातील हाॅटेलात वेश्याव्यवसाय, पोलिसांचा छापा, दोन महिलांची सुटका
राहुरी | अशोक मंडलिक : नगर – मनमाड महामार्गावरील कोल्हार खुर्द शिवारातील हाॅटेल न्यु प्रसाद येथे राहुरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात पुन्हा अवैध अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे सिद्ध झाले. दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली. यात एक परराज्यातील आहे. आरोपी वसंत लोंढे याला ताब्यात घेण्यात यश आले. पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे व त्यांच्या सहकारी वर्गाने यशस्वी कामगिरी केली.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २४ जानेवारी रोजी श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे राहुरी पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी बनावट ग्राहक पाठवत दोन पंचासमक्ष नगर-मनमाड महामार्गावरील कोल्हार खुर्द गावचे शिवारातील हाॅटेल न्यु प्रसाद लगत असणारे अपना नाष्टा सेंटरच्या पत्र्याचे शेड पाठीमागील पत्र्याचे खोल्यात वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या माहितीवरून दि २४ जानेवारी रोजी पहाटे २-४५ वाजता छापा टाकून कारवाई करण्यात आली. यात दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली असून यातील एक महिला परराज्यातील आहे.
सदरच्या छापा कारवाई दरम्यान दोन हजार रूपये रोख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी वसंत रघुनाथ लोंढे रा. कोल्हार खुर्द याला ताब्यात घेऊन राहुरी पोलिस ठाण्यात दिनांक २४ जानेवारी रोजी पावणेसहा वाजता स्त्रिया व मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा १९५९ चे कलम ३,४,५,७,८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी वसंत लोंढे याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात समक्ष हजर करून त्याचा पोलिस कस्टडी रिमांड घेत पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान आरोपी वसंत लोंढे याचा गुन्हा अभिलेख तपासता यापूर्वी त्याच्या विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात वरील कलमान्वये आणखी गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे तर यापूर्वी त्याने अशाच गुन्ह्यात शिक्षा भोगलेली आहे. तरीही सदर आरोपी अजूनही या व्यवसायात सक्रिय आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी नागरिकांना केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ भ्रमणध्वनी क्र ८१०८७६७६८१ अथवा दूरध्वनी क्र. ०२४२६, २३२४३३ यावर माहिती द्यावी आपले नाव, पत्ता गुप्त ठेवला जाईल.
वरील कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीरामपूर स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे, उपनिरीक्षक नीरज बोकील, कर्मचारी विकास साळवे, सचिन ताजणे, नदिम शेख, मंजूश्री गुंजाळ, चालक जालिंदर साखरे, रोहित पालवे, आजिनाथ पाखरे यांनी केली.